गृह, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्र्यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांशी संवाद वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी 'पीडीकेव्ही'चे सहकार्य घेणार वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर
अकोला, दि. ६ : वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन त्यानुसार जिल्ह्यात योजना, उपक्रम राबविण्यात येतील. त्यासाठी शासन स्तरावरून, तसेच जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे वर्धा जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी एकात्मिक कृषी विकास आराखडा तयार करण्याबाबत चर्चा समिती कक्षात झाली, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलसचिव सतीश ठाकरे, वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे
यांच्यासह कृषी तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. भोयर म्हणाले की, वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त असल्याची कारणे शोधून त्यावर भरीव उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने एकात्मिक कृषी विकास आराखडा तयार करणे, जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र व इतर यंत्रणा अधिक सक्षम बनवणे अशा बाबींचे नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ संशोधकांनी वर्धा जिल्ह्याच्या अनुषंगाने परिपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य करावे. त्यांच्या सूचना अमलात आणण्यासाठी आवश्यक निधीची शासन स्तरावरून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद करण्यात येईल. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार असून त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील. योजना- उपक्रमांसाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कुलगुरू डॉ. गडाख यांनी कृषी विद्यापीठाचे उपक्रम, आदर्श ग्राम योजना आदी बाबींची माहिती दिली. शेतकऱ्यांकडून एकच पीक न घेता एकात्मिक कृषी व्यवस्थापन प्रणाली व पशुपालन, पूरक व्यवसाय निर्माण करणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यासाठी आवश्यक उपाययोजना व आराखड्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
श्री. तोटावार यांनी जिल्ह्यातील विविध बाबींची माहिती दिली.
प्रारंभी कुलगुरू डॉ. गडाख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन राज्यमंत्री श्री. भोयर यांचा सत्कार करण्यात आला.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा