दरडोई उत्पन्न दरात जिल्ह्याच्या क्रमवारीत सुधारणा आवश्यक ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - पालक सचिव सौरभ विजय
दरडोई उत्पन्न दरात जिल्ह्याच्या क्रमवारीत सुधारणा आवश्यक
‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
-
पालक सचिव सौरभ विजय
अकोला, दि. १४ : दरडोई उत्पन्न दरात जिल्ह्याच्या क्रमवारीत सुधारणा
होणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी उत्पादकता वाढविण्याबरोबरच मोठी रोजगार निर्मिती, उद्योगांची
वाढ व अधिकाधिक गुंतवणूक झाली पाहिजे. त्यासाठी 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने
व्यवसाय सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) व गतिमान कार्यप्रणाली निर्माण करावी, असे निर्देश
वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय) तथा जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय यांनी केले.
नियोजनभवन येथे राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या सातकलमी कृती कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कु्ंभार, जि. प. मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील
लहाने, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्भभट्टी, निवासी
उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.
दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीत राज्यात जिल्ह्याचा २५ वा क्रमांक आहे.
ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीसाठी उद्योग, व्यवसायातील गुंतवणूक
वाढली पाहिजे. त्यासाठी व्यवसाय सुलभीकरण प्रक्रिया राबवा. उद्योगांना लागणा-या परवानग्या,
वीज, पाणी आदी सुविधा आदी वेळेत मिळाव्यात. त्यासाठी एक खिडकी योजनेसारखे उपक्रम, तसेच
शुद्ध पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, आवश्यक सुविधांची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे
निर्देश पालक सचिव श्री. विजय यांनी दिले.
100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने तक्रार निवारण प्रणाली
अधिक गतिमान करावी व सर्व कार्यालयात आवश्यक माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले किंवा
कसे, याची तपासणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गुंतवणूकवाढीच्या दृष्टीने गतवर्षी
विविध कंपन्यांमार्फत ८०० कोटी रू. चे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातील जवळजवळ १९०
कोटी रू. च्या प्रकल्पांकडून उत्पादन प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित करार प्रत्यक्षात
येण्यासाठी, तसेच निर्यातवाढीच्या दृष्टीनेही सर्वंकष प्रयत्न होत आहेत.
तक्रारींच्या निवारणासाठी तालुका स्तरावर साप्ताहिक तक्रार निवारण दिवसाचे
आयोजन करण्यात येत आहे. त्यात गत दोन आठवड्यात ४५४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
त्याचप्रमाणे, जानेवारी महिन्यात जिल्ह्यात २ हजार ५३० तक्रारींचे निवारण झाले. सातकलमी
कार्यक्रमानुसार विविध कार्यालयात स्वच्छता, संकेतस्थळ अद्ययावतीकरण, देखभाल, दुरूस्ती,
माहितीफलक आदी प्रयत्नांची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा