विविध दालनांतून नामवंत प्रकाशनांचे ग्रंथ उपलब्ध ‘अकोला ग्रंथोत्सवा’ला उत्साहात प्रारंभ
विविध दालनांतून नामवंत प्रकाशनांचे ग्रंथ उपलब्ध
‘अकोला ग्रंथोत्सवा’ला उत्साहात प्रारंभ
अकोला, दि. १३ : ग्रंथदिंडी,
ग्रंथपूजन, ग्रंथांची महती सांगणा-या रांगोळ्या, फलक, घोषणा, मान्यवर साहित्यिकांबरोबरच
बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वाचकांची उपस्थिती, पुस्तकांची समृद्ध दालने अशा उत्साहपूर्ण
वातावरणात जिल्हा ग्रंथालयाच्या परिसरात अकोला ग्रंथोत्सवाला आज प्रारंभ झाला.
प्रारंभी प्रमिलाताई ओक सभागृह येथून जिल्हा ग्रंथालयापर्यंत ग्रंथदिंडी
काढण्यात आली. ग्रंथप्रेमी व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. ग्रंथदिंडी व
ग्रंथपूजनानंतर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे
उद्घाटन झाले.
साहित्यिक पुष्पराज गावंडे ग्रंथोत्सवाच्या अध्यक्षस्थानी होते. विभाग
ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, अकोला ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ,
साहित्यिक चंद्रकांत झटाले, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सहायक ग्रंथालय
संचालक राजेश पाटील, एस. आर. बाहेती, ग्रंथ निरीक्षक राजेश कोलते आदी उपस्थित होते.
वाचनाप्रती वाढलेली उदासीनता चिंताजनक : गावंडे
वाचन मेंदूची मशागत करते. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. तथापि, समाजातील
वाचनाप्रती वाढत चाललेली उदासीनता चिंताजनक आहे. ती दूर करण्यासाठी व चांगले वाचक घडविण्यासाठी
वाचनालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पराज गावंडे यांनी
यावेळी केले. श्री. कोटेवार यांनी ग्रंथालयांची भूमिका, अडचणी व त्यांच्या निराकरणासाठी
होत प्रयत्न यांची माहिती दिली. श्री. पवार यांचेही भाषण झाले. श्री. पाटील यांनी प्रास्ताविक,
तर श्री. कोलते यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र काल,
आज आणि उद्या या विषयावर अक्षय राऊत यांचे व्याख्यान झाले. ग्रंथोत्सवाच्या दुस-या
दिवशी (१४ फेब्रुवारी) सकाळी १०.३० वा. कलावंत आचल सदार सदाबहार गीते सादर करतील. त्यानंतर
‘पाल्यांना वाचनाकडे वळविण्यासाठी पालकाची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र, तसेच ‘स्मृतीच्या
मशाली अनामिक स्वातंत्र्य संग्राम सेनानींचे क्रांत दर्शन’ हा कार्यक्रम सादर होईल.
त्यानंतर हास्य कवीसंमेलन व दुपारी ४.३० वा. समारोप समारंभ होणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा