साहित्य परिषदेची घटना साकारणारे अकोल्याचे साहित्य संमेलन

 

दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त अकोल्यात झालेल्या सातव्या साहित्य संमेलनासंबंधीच्या काही आठवणी…


साहित्य परिषदेची घटना साकारणारे अकोल्याचे साहित्य संमेलन

 

महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीला दिशा देणा-या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेला मूर्त रूप अकोला येथे १९१२ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात मिळाले.

इ. स. १९०९ चे मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे झाले. त्यानंतर इ. स. १९१० व १९११ या वर्षी संमेलन होऊ शकली नाहीत. असा खंड पडू नये यासाठी अकोला येथील सामाजिक चळवळीचे धुरीण, साहित्यिक व प्रबोधनकार वि. मो. महाजनि यांनी पुढाकार घेतला आणि पुढे तो सिद्धीसही आला. वि. मो. महाजनि हे स्वत: पुणे येथे १९०७ मध्ये झालेल्या पाचव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

 

व-हाड प्रांताची विद्या- परिषद १९१२ मध्ये अकोला येथे भरणार होती. त्यानिमित्त अकोल्यात महाराष्ट्राची साहित्य परिषद भरवावी, असा विचार प्रबोधनकार महाजनि यांनी मांडला. त्याकाळी बहुतेक दरसाल प्लेगची साथ ठरलेलीच असे. तसे घडू शकते अशी चिंता होतीच. मात्र, सुदैवाने संमेलनाचा योग आलाच.

 

अकोला येथे दि. २९, ३० व ३१ ऑक्टोबर १९१२ रोजी अकोला येथे सातवे साहित्य संमेलन भरले. स्वागताध्यक्ष म्हणून वि. मो. महाजनि यांची निवड झाली. महाराष्ट्रातील सर्व शहरांबरोबरच मराठी बांधवांचे वास्तव्य असलेल्या इंदूर, देवास, धार, ग्वाल्हेर, काशी, प्रयाग, बडोदा, अहमदाबाद, कोलकाता, रंगून अशा सर्व ठिकाणी साहित्यिक व साहित्यप्रेमींना जवळजवळ ८०० पत्रे पाठविण्यात आली.

संमेलनात मराठी भाषा, साहित्यासंबंधी सात सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. अकोला येथे त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण विचारप्रवर्तक होते. मराठीच्या पुस्तकांत इंग्रजी शब्दांचा भरणा अधिक होत असल्याची चिंता त्याकाळी व्यक्त होत होती. त्याबाबत ह. ना. आपटे यांनी काही उपाय सुचवले. ते म्हणाले की, युनिव्हर्सिटीत महत्वाचे विषय मराठीतून शिकवले जावेत. मॅट्रिकपर्यंतचे सर्व शिक्षण मराठीत झाले पाहिजे. मराठी साहित्य सभेसारख्या संस्थांनी मराठी कोषाची अद्ययावत आवृत्ती नियमित प्रसिद्ध करावी. हिंदुस्थानातील सर्व भाषांच्या प्रतिनिधींनी सहकार्य म्हणून विविध शास्त्रांतील पारिभाषिक शब्दांचा कोष तयार केला पाहिजे.’

‘आपली मातृभाषा मराठी भाषेचा अभिमान आपण धरिला पाहिजे. तो ज्यांनी धरला त्यांच्या अभिमानामुळेच मराठी भाषेला अर्थसमर्थता आली आहे. या अर्थसमृद्ध भाषेत कोणतेही शास्त्र शिक्षण देता येईल, वाटेल तो विचार मांडता येईल. वाङमयाचे सर्व हेतू सिद्ध करण्याइतके सामर्थ्य आपल्या मातृभाषेत आहे’,  असे उद्गारही ह. ना. आपटे यांनी काढले होते.

संमेलनाची नियमबद्ध घटना असावी, असा विचार बडोद्याला डॉ. कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेतील संमेलनात पुढे आला होता. त्याला १९१२ मधील अकोला येथील संमेलनात निश्चित स्वरूप प्राप्त झाले. साहित्य परिषदेची घटना प्रत्यक्ष स्वरूपात आकाराला आली. हे अकोला साहित्य संमेलनाचे फलित आहे.

संमेलन दरवर्षी व्हावे. विविध प्रांतांत संमेलने घ्यावीत. संमेलनाची आर्थिक तजवीज करण्याच्या दृष्टीने कायमचा फंड उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा काही सूचना संमेलनातून पुढे आल्या होत्या. अकोला येथील साहित्य संमेलन हे चळवळीला पुढची दिशा देणारे ठरले.

त्यावेळी मराठी साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबई येथे होते. परिषदेची रीतसर घटनेसह स्थापना झाल्यानंतरचे पहिले अध्यक्ष अकोल्याचे प्रबोधनकार वि. मो. महाजनि होते. इ. स. १९१५, १९१७ व १९२२ मध्येही अध्यक्षपदी महाजनि यांचीच निवड झाली. महाराष्ट्राचे साहित्य- सांस्कृतिक केंद्र असणा-या पुण्यामुंबईच्या बाहेरील व-हाडातील अकोला येथील एका व्यक्तीकडे दीर्घकाळ अध्यक्षपद राहावे हा त्यांच्या साहित्यसेवेचा, तसेच अकोला नगराचाही गौरव होता.

महाजनि यांच्याच कारकिर्दीत ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या नियतकालिकाचा प्रारंभ झाला. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी महाजनि यांनी केलेले संघटनात्मक कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्याबाबत लेखिका डॉ. पुष्पा लिमये यांनी ‘एकोणविसाव्या शतकातील प्रबोधनकार : विष्णू मोरेश्वर महाजनि (व्यक्ती आणि वाङमय)’ हा ग्रंथ मेहनत व अभ्यासपूर्वक लिहिला आहे. अकोला येथून त्याकाळी ‘व-हाड समाचार’ हे वर्तमानपत्र प्रसिद्ध होत असे. त्यात या संमेलनाबाबत व येथील सामाजिक चळवळींचा वृत्तांत नियमित प्रसिद्ध होत असे.

-        हर्षवर्धन पवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

अकोला

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम