गृह राज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबियांशी संवाद पोलीसांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण करणार - गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 









अकोला, दि. ६ : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात.  त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या जाणून घेता याव्यात याचसाठी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. या अडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज येथे दिली.    
अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे गृह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस कुटुंबीयांसोबत संवाद मेळावा पोलीस लॉन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. भोयर म्हणाले की, संवाद कार्यक्रमातून पोलीस व कुटुंबियाच्या समस्या जाणून घेता आल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडून निश्चितपणे पावले उचलली जातील. जिल्हा पातळीवर व विभागीय पातळीवर ज्या समस्यांचे निराकरण करता येणे शक्य आहे त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पोलीस वसाहत सुधारणा, निवासस्थाने निर्मिती आदी कामांनाही गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. सिंह यांनी दलातर्फे करण्यात आलेली विविध प्रकारची कार्यवाही व उपक्रम यांची माहिती दिली. गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस लॉनच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दामिनी पथक व विविध पथकांशी संवाद साधून त्यांनी कर्मचा-यांचे मनोबल वाढविले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम