आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारातून समृद्धी’ उपक्रमाचा शुभारंभ सेवा सोसायट्यांना जागा मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करू - राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
अकोला, दि. 6 : सहकार चळवळीत खेडोपाडी महत्वाची भूमिका बजावणा-या सेवा सहकारी सोसायट्यांना कार्यालयासाठी जागा मिळण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू, असे प्रतिपादन सहकार, शालेय शिक्षण व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज येथे केले.
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारातून समृद्धी’ उपक्रमाचा शुभारंभ राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार किरण सरनाईक, बँकेचे अध्यक्ष संतोषकुमार कोरपे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, सुभाष कोरपे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. भोयर म्हणाले की, सेवा सहकारी संस्था संगणकीकृत व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाकडून संगणक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून मागणी होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. चांगल्या उपक्रमांसाठी शासनाचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार श्री. सावरकर, आमदार श्री. सरनाईक, माजी मंत्री श्री. ठाकरे यांचीही भाषणे झाली.
बँकेचे अध्यक्ष श्री. कोरपे यांनी बँकेची वाटचाल, उपक्रमांबाबत माहिती दिली. घुंगशी येथील सोसायटीला १०७ वर्षे पूर्ण झाल्याबाबत संचालकांचा सत्कार करण्यात आला.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा