विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ सांघिक भावना निर्माण करण्यासाठी उपक्रम उपयुक्त - विभागीय आयुक्त श्वेता सिंघल
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा उत्साहात
प्रारंभ
सांघिक भावना निर्माण करण्यासाठी उपक्रम उपयुक्त
-
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल
अकोला, दि. ७ : विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते अमरावती
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ वसंत देसाई क्रीडांगण येथे आज
झाला. अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सांघिक भावना व खिलाडू वृत्ती निर्माण करण्यासाठी
हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास विभागीय आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी अजित कुंभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जि. प.
मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर,
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी
उपस्थित होते.
महसूल विभाग विविध शासकीय कामांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतो.
विविध जबाबदा-या पार पाडण्यासाठी सांघिक भावनेने काम होणे आवश्यक असते. ही सांघिक भावना
व खिलाडू वृत्ती निर्माण करण्यासाठी उपक्रम उपयुक्त ठरेल, असे श्रीमती सिंघल यांनी
सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, महसूल विभाग नैसर्गिक आपत्ती
निवारण, महसूल गोळा करणे, विविध योजनांची अंमलबजावणी अशी अनेक कामे पार पाडत असतो.
दिवसातील आपला बहुतांश वेळ कार्यालय व कामकाजात व्यतीत होतो. अशावेळ सांघिक वृत्ती,
ताणतणावांचे निरसन, खिलाडूपण व अधिकारी- कर्मचा-यांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण करण्यासाठी
स्पर्धेसारखे उपक्रम महत्वाचे ठरतात.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले व स्पर्धेतील
खिलाडूपण जोपासण्याची सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. कबड्डी, खो- खो, फुटबॉल, ॲथलिटेक्स.
बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस आदी विविध क्रीडाप्रकारांत विविध संघांत सामने होणार
आहेत. स्पर्धेचा बक्षीसवितरण समारंभ दि. ९ फेब्रुवारी रोजी दु. ३ वा. होणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा