‘एमआयडीसी’ला कायम पाणीपुरवठ्यासाठी महान जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  



‘एमआयडीसी’ला कायम पाणीपुरवठ्यासाठी

महान जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. १२ : अकोला औद्योगिक क्षेत्राला कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी महान प्रकल्पातून जलवाहिनीचे काम ८६ टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित कामासाठी आवश्यक वनविभागाची परवानगी व इतर प्रक्रियेसाठी पाठपुरावा करावा. जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

 

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सुनील लहाने, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, ‘एमआयडीसी’चे विभागीय व्यवस्थापक प्रशांत पाडळकर, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, सहायक रचनाकार स्नेहा नंद, भागवत अनवणे यांच्यासह शहरातील उद्योजक उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील डाळ मिल परवाना किंवा नूतनीकरणासाठी अर्ज प्रलंबित असल्याची तक्रार आहे. ते तत्काळ निकाली काढावेत. अर्ज प्राप्त झाला की तो परिपूर्ण असेल तर १५ दिवसांत मान्यता दिली पाहिजे. त्रुटी असेल तर तत्काळ कळवले पाहिजे. ‘बीएसएनएल’च्या सेवेत वारंवार खंड पडत असल्याचीही तक्रार आहे. रस्तेनिर्मितीमुळे भूमिगत केबल खंडित झाली किंवा कसे, हे तपासून हा अडथळा कायमस्वरूपी दूर करावा. औद्योगिक क्षेत्रासाठी शहर बससेवेबाबत महापालिकेने कार्यवाही करावी.

एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी आहे. त्यावर पोलीसांचे सहकार्य मिळवून तत्काळ कार्यवाही करावी. औद्योगिक क्षेत्राच्या वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्र लवकर निर्माण व्हावे. ते पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करावेत. एमआयडीसी कार्यालयाला आवश्यक स्टाफसाठी पाठपुरावा करावा. औद्योगिक क्षेत्रात विशेषत: येवता परिसरात चो-यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आहेत. मागणीनुसार पोलीस ठाणे हद्दवाढ किंवा पोलीस चौकीचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठवावा. दरम्यान या परिसरात पोलीस गस्त वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

 

जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया लवकरच ऑनलाईन होईल, असे श्री. बनसोड यांनी सांगितले.  या बैठकीनंतर जिल्ह्यातील निर्यातवाढीच्या संधी याबाबत मार्गदर्शन अंकित गुप्ता यांनी केले.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम