दहावी- बारावीची परीक्षा : कॉपीमुक्त अभियान २२ केंद्रीय निरीक्षक व ६ भरारी पथकांची नियुक्ती
दहावी- बारावीची परीक्षा : कॉपीमुक्त
अभियान
२२ केंद्रीय निरीक्षक
व ६ भरारी पथकांची नियुक्ती
अकोला, दि. १० : दहावी व बारावीच्या
परीक्षेत कुठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून,
जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर २२ केंद्रीय निरीक्षक पथक व ६ भरारी पथके नियुक्त
करण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशही लागू
करण्यात आला आहे.
केंद्रीय निरीक्षक, तसेच भरारी पथकांनी
सजग राहावे. कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार
यांनी दिले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या
कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी निर्गमित केला आहे.
आदेशानुसार, पाचहून अधिक व्यक्तींना
परीक्षा केंद्रावर एकत्रित प्रवेश करता येणार नाही. शांततेस बाधा होईल असे कृत्य करता
येणार नाही. केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन, टायपिंग सेंटर,
लॅपटॉप, पानाचे दुकान, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुरू ठेवता येणार नाही. इंटरनेट, मोबाईल
फोन, सेल्युलर फोन, ई-मेल आदींच्या वापरास बंदी आहे. केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती,
वाहनास मनाई आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारीपासून,
दहावीची दि. २१ फेब्रुवारीपासून होत आहे. जिल्ह्यातील ८८ केंद्रांवर २५ हजार ५६९ विद्यार्थी
बारावीची आणि ११९ केंद्रांवर २५ हजार ८५७ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा