गरजूंना वेळीच कर्जवाटप व्हावे; अवैध सावकारीला पायबंद घाला
-
ॲड. नीलेश
हेलोंडे पाटील यांचे निर्देश
अकोला, दि. १८ : गरजू शेतकरी बांधवांना वेळीच
कर्जवाटप व्हावे. अवैध सावकारीला कठोर पायबंद घालावा, असे निर्देश (कै.) वसंतराव नाईक
स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी आज येथे दिले.
शेती स्वावलंबन मिशनची जिल्हास्तरीय बैठक ॲड.
पाटील यांच्या अध्यक्षतेत लोकशाही सभागृहात झाली,
त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा उपनिबंधक
डॉ. प्रवीण लोखंडे, अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.जगदीश
बुकतारे, आदिवासी विकास विभागाचे मोहन व्यवहारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये अवैध
सावकारांविरुद्ध आतापर्यंत ५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण २१ प्रकरणांमध्ये
नोंदणीकृत खरेदीखत अवैध असल्याचे घोषित करण्यात येऊन अवैध सावकारीच्या ओघात संपादित
केलेली १५१.१५ एकर शेतजमीन, ४ हजार ९३९.५० चौ. फुट. जागा व एक राहती सदनिका संबंधितांना
परत करण्यात आलेली आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात खरीप हंगामासाठी १ हजार ३००
कोटी व रब्बी हंगामाकरिता २०० कोटी असे एकुण १ हजार ५०० कोटी लक्ष्यांक देण्यात आले.
त्यापैकी दि.१५ फेब्रुवारीअखेर खरीप हंगामाकरिता १ लक्ष ६ हजार ७०८ सभासदांना १ हजार
१५१.८२ कोटी कर्जवितरण व रब्बी हंगामासाठी ७ हजार ४४० सभासदांना ९५ कोटी १७ लक्ष पीक
कर्ज वाटप झाले, अशी माहिती बैठकीत सादर करण्यात आली.
ॲड, हेलोंडे पाटील म्हणाले की, एकही
पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे. जिल्ह्यात
चारा टंचाई उद्भवू नये यासाठी गायरान जमिनीवर चारा लागवड व्हावी. पीक विमा
योजनेच्या कंपनीच्या प्रतिनिधींचा तपशील, कौशल्य विकास कार्यक्रम आदींना
ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्धी मिळावी. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून
शेतकरीहिताचे उपक्रम राबवावेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचाही लाभ द्यावा.
बैठकीत शेतीच्या बांधावर जैविक
प्रयोगशाळेची उभारणी, प्रेरणा प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म अन्न प्रक्रिया
उद्योग, रेशीम लागवड, वन्य प्राणी नुकसान भरपाई, आदिवासी विभागाच्या शेतक-यांसाठीच्या
योजना आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा