जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देऊ - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण
प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देऊ
- पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
अकोला, दि. २२ : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र, तसेच २१ हजार ६२७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्ता मिळाला आहे. अद्यापही ज्यांना घर नाही अशा जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवास योजनेतून हक्काचे घर मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण, १० लाख व्यक्तींना पहिला हप्ता वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात झाले. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय ‘गृहोत्सव’- कार्यक्रमात जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मंजुरीपत्र वितरण झाले. सिव्हील लाईन येथील जि. प. संविधान सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार अनुप धोत्रे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, विकास उपायुक्त राजीव फडके, जिल्हा ग्रामीण आवास योजनेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व जिल्ह्यातील लाभार्थी बांधव उपस्थित होते.राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपण जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले.
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, गरीबांच्या आयुष्यात घराची संधी एकदाच येते. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. लाभार्थ्याचे घर पूर्ण होण्यासाठी त्याला फोटो अपलोड करण्यापासून सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन केले पाहिजे. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडून वेळोवेळी भेटी व टप्पेनिहाय आढावा घेतला जावा. योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती द्यावी जेणेकरून आवश्यक तरतुदी पूर्ण होऊन काम पुढे जाईल व गरीबांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. जिल्हा परिषद प्रशासनाने कमी वेळामध्ये घरकुल मंजुरीचे केलेले काम हे कौतुकास्पद आहे.
राज्यात २० लाख व्यक्तींना एकाचवेळी घरकुल मंजुरीपत्र मिळत असून, हा दिवस ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार श्री. धोत्रे म्हणाले की, स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्याची संधी योजनेमुळे मिळाली आहे. ही योजना अधिकाधिक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. श्रीमती वैष्णवी यांनी योजनेत पूर्ण झालेल्या व प्रगतीतील कामांची माहिती दिली. श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले.
तालुका स्तरावर पंचायत समिती सभागृहात आमदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, तसेच ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेत मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम झाले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा