प्रसाद, भंडारा वितरण करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन


अकोला, दि.३०(जिमाका)-  सार्वजनिक गणेश उत्सव बुधवार दि.३१ पासून साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्याअनुषंगाने सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार,प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार www.foscos.fssai.gov.in या वेबसाईटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ, परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा. तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी, प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रितीने विल्हेवाट लावावी, प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. अकोला जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम