प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना :कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा सोमवार(दि.15) पासून

 अकोला दि. 12 (जिमाका)- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या जनजागृतीसाठी  सोमवार दि.15 पासून ते बुधवार दि.31 ऑगस्ट दरम्यान कृषी  प्रक्रिया जागृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविली जाणार आहे. वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गट, संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत खालील बाबीसाठी अर्थसहाय्य दिले जातेः-

वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी (नविन प्रकल्प उभारणी / अस्तित्वात असलेले कार्यरत प्रकल्पाचे विस्तारीकरण / आधुनिकीकरण) भांडवली गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्य या घटकांतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ओडीओपी/एनओएन ओडीओपी) साठी पात्र भांडवली खर्चाचे 35 टक्के जास्तीत जास्त रक्कम 10 लक्ष रूपये अनुदान देय असून यामध्ये वैयक्तिक मालकी / भागीदार, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट (एसएचजी), गैर सरकारी संस्था (एनजीओ), सहकारी संस्था (को-ऑपरेटीव्ह), खाजगी कंपनी यांचाही समावेश केला आहे.

सामाईक पायाभुत सुविधा यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के बँक कर्जाशी निगडीत अनुदान देय आहे. शेती स्तरावरील पायाभुत सुविधा, पॅकहाऊस, पॅकेजिंग आणि ग्रेडींग, प्रक्रिया युनिट, साठवण गृह, वितरण, वाहतूक व्हॅन कमाल आर्थिक मर्यादा 3 कोटी विहीत करण्यात आलेली आहे. मार्केटिंग/ब्रँडींग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे. जिल्हास्तरावर बँका तसेच ‘आत्मा’ अशा विविध यंत्रणांद्वारे स्वयंसहाय्यता गटांची स्थापना केली आहे. यापैकी अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणाऱ्या गटांना (एसएचजी / एफपीओ/को-ऑपरेटीव्ह) योजनेंतर्गत लाभ देय राहील.

योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी योजनेच्या ऑनलाईन पोर्टल www.mofpi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन प्राप्त अर्ज हे योजनेचे कामकाजाकरीता जिल्हास्तरावर नेमण्यात आलेले जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्याकडे या पंधरवड्यात वाटप होतील तसेच काही त्रुटी असल्यास पूर्तता करून याच पंधरवड्यात परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत बँकेला कर्ज मंजूरीकरीता सादर केले जातील.

जास्तीत जास्त वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गट, संस्था यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी योजनेचे नोडल अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अकोला तसेच संबंधीत तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा संसाधान व्यक्ती यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ