विशेष लेखः- देशी वळू संगोपनाच्या संकल्पाने साजरा करू बैलपोळा

 



            आजमितीला बैलपोळा सण साजरा करताना गावातील वडीलधाऱ्या व्यक्तिंकडून बैलजोड्यांची घटती संख्या हा चर्चेचा विषय आहे. पूर्वीसारखे उमदे देशी बैल आता जनावरांच्या बाजारात देखील दिसेनासे झाले आहेत. देशी गोवंश संवर्धनाचे विविध उपक्रम अनेक पातळ्यांवर राबविले जात आहेत.मात्र पुढील काळात देशी वंशांची जनावरे गोठ्यात पाहायची असल्यास आज देशी वळू संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम पैदासक्षमता असलेल्या वळूशिवाय आपल्या देशी पशुधनाचा विस्तार होणे अशक्य आहे. म्हणूनच बैलपोळा सणाच्या निमित्ताने आज जागरूक पशुपालक आणि शेतकरी बांधवांनी देशी वळू संगोपन करण्याचा संकल्प मनी धरायला हवा. यासाठी देशी वळूचे पैदाशीसाठी महत्व, उत्तम वळूची लक्षणे व निवड समजून घ्यायला हवी.

कृषिप्रधान संस्कृती आणि पोळा

            श्रावण महिन्यात पिठोरी अमावास्येला आपण पोळा किंवा बैल पोळा उत्सव साजरा करतो. कृषिप्रधान संस्कृतीमध्ये वर्षभर शेतकामासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याच्या या जिवलग मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यत्वे मध्य भारतात म्हणजे, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात बैल पोळा उत्साहात साजरा होतो. मध्य भारतात बैलपोळा या नावाने परिचित हा उत्सव दक्षिण भारतात मट्टू पोंगल तर पूर्वोत्तर भारतात गोधन या नावाने साजरा केला जातो. श्रावण महिना भगवान शंकरच्या उपासनेचा आणि त्याचे वाहन नंदी, म्हणून बैलांच्या कष्टाची आठवण माणूस म्हणून ठेवण्यासाठी श्रावण महिन्यात बैलपोळा साजरा होतो. तेलंगणा राज्यात अशाच स्वरूपाचा सण पौर्णिमेला एरुवका नावाने आढळतो. प्राचीन काळापासून शेतीचा विकास पशुधनाच्या सहचर्याने होत गेला असल्याने बैलांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पराशार मुनींनी जमीन, बैल, बियाणे आणि स्वामी हे शेतीचे चार महत्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे वर्णीले आहे. वैदिक काळात गायींची जोपासना दुधासाठी जितकी महत्वाची तितकेच बैल शेतीकामासाठी उपयुक्त असल्याने एखाद्याकडे असणाऱ्या गायींच्या आणि बैलांच्या संख्येवरून त्याची श्रीमंती ठरवली जाई. वेदांमध्ये बैलांना आवश्यक जागा (पाच पावले म्हणजे अंदाजे ३.७५ मीटर), खाद्य (वैरण, बार्ली आणि चराई), पाण्याची व्यवस्था करण्याबाबत श्लोकात संगितले आहे. एका आदर्श शेतकऱ्याकडे किमान चार बैलजोड्या असाव्यात असेही वर्णन आहे.

            पारंपरिक पद्धतीने पोळा सणाला आपण बैलांची तेलाने मालीश करणे, खांदे मळणे, शिंग रंगवणे,  नवीन झूल चढवणे, दाव, घंटी इत्यादी साज देत सुशोभित करतो. सायंकाळी गावातील प्रतिष्ठित लोकांच्या साक्षीने शिंगाला मखर बांधलेल्या मानाच्या बैलजोडी मार्फत आंब्याचे तोरण ओलांडून पोळा फुटतो. शेतकऱ्याच्या या मित्राची वाद्यांसह मिरवणूक काढली जाते आणि घरोघर गृहीणींकडून बैलांची पुजा, औक्षण होते. तसेच दारी आलेल्या बैलाला घुगऱ्या वाढल्या जातात. आता या पारंपरिक पोळा सणाच्या रूपाकडे पाहिल्यास हा काही केवळ एक दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नाही. यानिमित्ताने बैलाची जोपासना, शारीरिक निगा, मालीश (खरारा करणे), पौष्टिक आहार देणे (ठोंबरा) या गोष्टी आपण ध्यानी धरायला हव्या.

वळू संगोपनाची गरज

            देशी पशुधन संवर्धंनासाठी शुद्ध वंशाचे जनावरे अधिक असणे गरजेचे आहे. कळपात एक उत्तम वळू अनेक माद्यांना फळविण्यासाठी पुरेसा असतो. देशी पशुधन संख्या वाढविण्यासाठी देशी वंशांचे वळू मोठ्या संख्येने आवश्यक आहेत. मात्र बदलत्या शेतीपद्धती, यांत्रिक शेतीची शेतकऱ्यांनी धरलेली वाट, प्रवासाची बदललेली साधने, चारापिके लागवडीचा अनुत्साह आणि एकूणच शास्त्रोक्त व्यवस्थापनाचा अभाव अशा कारणांनी वळूचे/बैलांचे संगोपन सर्वसाधारण पशुपालकास जड वाटू लागते. दिवसेंदिवस पशुधनाच्या संख्येत नर वासरांचे घटते प्रमाण नक्कीच पशूसंवर्धंनाच्या दृष्टीने चिंतनीय आहे.

 

वळू आणि देशी गोवंश संवर्धन

            स्थानिक पातळीवर आपण आपल्या गायी फळविण्यासाठी ज्या गोऱ्ह्याचा वापर करतो तो म्हणजे शास्त्रीय भाषेत वळू. ज्या वळूत संबंधित देशी वंशाचे बाह्यलक्षणे आणि प्रजोत्पादन गुणधर्मे दिसून येतात त्यास जातिवंत वळू म्हणता येईल. बाह्यलक्षणे म्हणजे रंगरूप, शारीरिक ठेवण, बांधा इ. तर प्रजोत्पादन गुणधर्मे म्हणजे उत्तम पिल्लावळ निर्माण करण्याची क्षमता. एखाद्या वळूपासून जन्माला येणारे वासरू/ कालवडी कशा आहेत याची चाचणी. कृत्रिम रेतन आज गावोगाव पोहोचले असले तरी अनेकदा गायीचा माजाचा कालावधी आणि रेतनकर्त्या व्यक्तीची सांगड जुळून आली नाही तर आपण गावातील उमद्या जोपासलेल्या वळूने नैसर्गिक फलन प्रक्रिया राबवितो. भारतात गायींच्या एकूण ५० देशी जाती आहेत आणि या जातीच्या लक्षणानुरूप प्रजननक्षमता धारण करणारा नर म्हणजेच वळू याला आपण देशी /जातिवंत वळू म्हणू शकतो. भारतातील गिर (गुजरात), सहिवाल (पंजाब), लाल सिंधी (पंजाब) व थारपारकर (राजस्थान) या अधिक दुध देणाऱ्या जाती दुधाळ वर्गात मोडतात. देशातील एकूण ५० गायींच्या जातींपैकी महाराष्ट्रात मुख्यतः ६ जाती आढळतात. महाराष्ट्रात देवणी, डांगी, गवळाऊ, खिल्लार, लाल कंधारी आणि कोकण कपिला या जाती आढळतात. मात्र देशी पशुधनात आपल्या स्थानिक हवामानाशी अनुकुलरित्या जुळवून घेण्याची विलक्षण शक्ती निसर्गाने प्रदान केली असून सकस दुध देण्याची क्षमता असते. याशिवाय निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता यांसारखे गुणधर्म पशुधनात आढळतात.

            शुद्ध वंश हा दोन शुद्ध वंश मादी आणि वळू यांच्या संकरातून निपजतो.जातिवंत वळू हा या अर्थाने पैदास व्यवस्थापनाचा आधारस्तंभ समजला जातो. देशी पशुधन संख्या वाढविण्यासाठी देशी वंशांचे वळू मोठ्या संख्येने आवश्यक आहेत. गोवंश संवर्धन करण्यासाठी त्या त्या गोवंशाचे उत्तम वळू जोपासणे आत्यंतिक महत्वाचे आहे. मात्र बाजारात पशुधन खरेदी करतेवेळी किंवा एखाद्या वळूची निवड करतेवेळी आपणास वळू म्हणून त्या नराच्या ठायी उत्तम लक्षणे कोणती आहेत याची कल्पना असणे महत्वाची ठरते.

उत्तम वळूची शारीरिक लक्षणे व निवड

            वळूचे निरीक्षण करताना सर्वप्रथम दृष्टीस पडतो तो त्याचा शारीरिक आकार. प्रत्येक पशुधनाची विशिष्ट अशी शारीरिक डौलदार बांधणी असते. म्हणून उत्तम वळू निवडताना ज्या जातीचा वळू निवडायचा आहे त्या जातीची जातीनिहाय गुणधर्म आपणास माहिती असावी. शरीराच्या प्रत्येक भागाचे अपेक्षित रूप वळूत असावे. उंच डोके, रुंद मुख, विस्फारलेल्या नाकपुडया, चमकदार डोळे, मजबूत खांदा, रुंद छातीचा घेर, सरळ खुरे, समान उंचीचे पाय, वाशिण्ड, घाटदार शिंगे, पोटाशी घट्टपणे चिकटलेले मुतान, समान व सुडौल अंडकोष इ.लक्षणे संबंधित वळू उत्तम असल्याचीच पावती देतात. यासोबत त्या वळूची वर्तणूक फलनक्षम आणि माद्यांच्या संपर्कात येताच प्रतिक्रिया दक्षतेने देणारा वाटावी. उत्तम वळू हा चपळ, कार्यक्षम, निरोगी आणि तरुण वयाचा असावा.  जेव्हा वळूचा वापर व्यावसायिक पातळीवर करण्यात येतो, तेव्हा वळूची निवड केवळ बाह्यलक्षणे आणि रूपावर अवलंबून ठेवता येणार नाही. व्यतिरिक्त प्रगतिशील पशुपालकांनी वळूच्या प्रजनन गुणधर्मचा लेखाजोखा त्याच्या वीर्यपरीक्षण माध्यमातून घ्यायला हवा. ज्या वळूची निवड कराची आहे त्याच्या विर्यात असलेली शुक्राणूसंख्या आणि त्यातही जीवित शुक्राणू संख्या अधिक महत्वपूर्ण आहे. वळू बृसेल्लोसिस, प्रोतियोतीस, विबृओसिस सारख्या जिवानुजन्य रोगांपासून रोगमुक्त असणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. क्यारिओटायपिंग म्हणजेच रंगसूत्रातील दोष (संख्या किंवा आकार) तपासणे ही महत्वपूर्ण पशुवैद्यकीय चाचणी आहे. ही चाचणी जिल्हापातळीवर कार्यरत पशू रोगनिदान प्रयोगशाळा, वीर्य परीक्षण केंद्र किंवा खासगी प्रयोगशाळा यांचे माध्यमातून पशुपालकास करता येते. क्यारिओटायपिंग तपासणीतून वळूंच्या रंगसूत्रांच्या संख्येत अथवा आकारातील दोष लक्षात येतात. रोबार्ट्सोनियन ट्रान्सलोकेशन नावाच्या रंगसूत्रातील दोषात दिसला उमदा व सक्षम असणारा वळू प्रजननाच्या दृष्टीने अकार्यक्षम असतो.

            एखाद्या प्रस्थापित शासकीय अथवा अशासकीय पशूप्रक्षेत्रावरून वळू निवडताना काही निकष समजून घेणे गरजेचे ठरते. उपलब्ध अनेक वळूंपैकी एका वळूची निवड करयची असते अशावेळी प्रत्येक वळूची वैयक्तिक गुणधर्म आणि लक्षणे तपासणी हा मुख्य आधार असावा. प्रत्येक वळूची प्रजनन क्षमता हे तेथील नोंदीवरून देखील कळेल. वळूंच्या आई वडिलांची उत्पादन किंवा प्रजोत्पादन संबंधी माहिती प्रक्षेत्रावरील वंशावळ पाहून समजू शकेल. यापेक्षा अधिक ठोस आधार म्हणजे, प्रत्येक वळू पासून निर्मित संततीचा आढावा. ज्या वळूच्या कालवडी अधिक उत्पादनक्षम आढळतील, साहजिकच त्या वळूची अंनुवंशिक क्षमता उच्च प्रतीची समजायला हरकत नाही. जेव्हा प्रत्येक वळूचा असा सांगोपांग आढावा घेतला जाईल, तेव्हा आपोआपच वळूंमध्ये क्रमवारिता प्रस्थापित होईल. या क्रमवारीवरीतेमधून सिद्ध वळू निवडणे अधिक सुलभ होईल. तथापि हे करण्यासाठी आपल्याला पैदासशास्त्रातील तज्ञ पशुवैद्यकाची मदत घेणे आवश्यक आहे.

 

वळू संगोपनासाठी पशुपालकांची भूमिका

            वळू संगोपन हे पशुपालकाच्या गोठ्यात घडणारी प्रक्रिया आहे. म्हणून शास्त्रीय पद्धतीने गोठ्यात व्यवस्थापन करताना काही बाबींचा अंतर्भाव सर्वसाधारण व्यवस्थापन करताना करावा लागतो. आहार, पैदास आणि आरोग्य व्यवस्थापन हे कुठल्याही यशस्वी पशूसंगोपनाची त्रिसूत्री आहे.

·         वळूचा निवारा स्वच्छ, प्रकाशमान, हवेशीर असावा. मात्र ऊन, वारा, पाऊस अशा वातावरणातील बदलानुरूप निवाऱ्याचे नियोजन करावे.

·         दररोज एकदा वळूला खरारा करावा जेणेकरून त्यांच्या रक्ताभिसरणाला चालना मिळेल.

·         वळूचे खूर तपासणी नियमितपणे करावी.

·          वजनाच्या प्रमाणात आहार नियोजन करावे. वळूला साधारणतः दिवसाला  ३० किलो चारा लागतो. ६-१०किलो कुटार तसेच ढेप/ पेंढ (मोठा आकार- २ते ५किलो, माध्यम- १.५ ते ५ किलो आणि कमी -१ ते २.५ किलो)  द्यावी.

·         मुरघास, खनिज मिश्रणे, चारा – युरिया प्रक्रिया आणि अतिरिक्त पूरक खाद्य गरजेनुसार द्यावे.

·         वळूचे वय आणि प्रजनन क्षमता यांचा जवळचा संबंध आहे. म्हणून आंतरपैदास (रक्ताच्या नात्यातील संबंध) व त्याचे धोके टाळण्यासाठी दर दोन वर्षांनी गोठ्यातील वळू बदलणे आवश्यक आहे.

·         गावराण पशुधनात शुद्ध वंशाचे प्रमाण वाढवण्यासाठी बाह्यपैदास व क्रमोन्नती (ग्रेडिंग अप) उपयुक्त ठरते.

·         ज्या वंशाची गाय असेल त्याच वंशाचा/ जातीचा वळू वापरण्यास प्राधान्य द्यावे.

·         निरोगी वळू जोपासना करण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बृसेल्ला, रक्तक्षय, अंथरक्स यांच्या चाचण्या नियमित करणे.

·         नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून लाळखुरकत, बुळकांड्या अशा रोगांचे लसीकरण करावे.

·         गोचीड नियंत्रण करण्यासाठी गोठा सफाई महत्वाची आहे.

 

पोळा साजरा करताना घ्यावयाची काळजी

·         आपल्या बैलांना सुशोभित करताना, शिंगे रंगवताना त्यांच्या डोळ्यात रंग जाणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो शिंगांना ऑइल पेंट देणे टाळावे. शिंगे तासून अणुकुचीदार करू नयेत.

·         बैल धुण्यासाठी नदी, तलाव किंवा बंधारा, सार्वजनिक पाणवठा याठिकाणी नेऊ नये.

·         घरोघर बैलांचे ओवाळणी करताना देण्यात येणारा पुरणपोळीचा नैवेद्य/भरमसाठ ठोंबरा खाल्यास पोटफुगी किंवा हगवण बाधा होण्याचा संभव असतो. अशावेळी घरगुती उपाययोजण्याऐवजी पशुवैद्यकांना तात्काळ संपर्क करावा.

·         मोठा कर्णकर्कश आवाज (डीजे) करणे टाळावे जेणेकरून जनावरे बिथरणार नाहीत.

            पोळा या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील देशी पशुधनाच्या संवर्धनासाठी बैलांचे आणि वळूचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. पशुपालकांनी शुद्ध वंशाचे बीज आपल्या गोठ्यातील गायींना देण्यास प्राधान्य द्यावे. जागरूक पशुपालकांनी पोळा या सणाला संकल्प धरावा की किमान एक बैलजोडी आणि एक उमदा देशी जातिवंत वळूचे संगोपन मी निष्ठेने करेल. पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी बालगोपाळांचा 'तान्हा पोळा' असतो त्यादिवशी त्यांना देशी पशुधनाचे महत्व अवश्य समजून सांगा.

 

लेखकःडॉ. प्रवीण बनकर-सहाय्यक प्राध्यापक, (९९६०९८६४२९)

 पशू अंनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प.संस्था, अकोला.

 डॉ. स्नेहल पाटील-पशुधन विकास अधिकारी, तालपसचि, बार्शीटाकळी जि.अकोला.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ