अकोला बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्न; छत्तीसगड येथील हरवलेले बालक पालकांच्या स्वाधीन


अकोला दि.३०(जिमाका)-  झारखंड येथून हरवलेला एक बारा वर्षे वयाचा बालक हा सोमवारी (दि.२९) अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. अकोला रेल्वे स्थानकावर हा बालक भटकतांना आढळून आला होता. चाईल्ड लाईनच्या टीमने या बालकाला शोधून बाल संरक्षण कक्षाच्या स्वाधीन केले. येथील शासकीय निरीक्षण गृह व बालगृह येथे या बालकाचा आतापर्यंत सांभाळ करण्यात आला.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की, अकोला रेल्वेस्टेशन येथे (दि.१९ जुलै रोजी) रात्री १२ वर्षीय हा बालक भटकताना निदर्शनास आला. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या टिमने या बालकाला विचारपूस केली मात्र तो गोंधळलेल्या स्थितीत होता व बोलत नव्हता. चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टिमने त्या बालकाला विश्वासात घेवून त्याच्या पालकांची शोध मोहिम सुरु केली.

   जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु
लाडुलकर यांचे मार्गदर्शनाखाली शोध मोहिम राबविण्यात आली. परिवाराचा शोध लागेपर्यंत या बालकाला शासकीय निरीक्षणगृह व बालगृह, अकोला येथे दाखल करण्यात आले. हा बालक १२ वर्षाचा असून अतिशय शांत व कमी बोलणारा होता. तो स्वतःचे नाव व गावाचे नाव सांगण्यात असमर्थ दिसून येत होता. काहीही विचारल्यावर हा बालक ‘टोनीया’ हाच शब्दच पुन्हापुन्हा उच्चारीत असे.
 ‘टोनीया’ शब्द नक्की त्याचे नाव आहे की गावाचे नाव? हा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला.अखेर टोनीया शब्दाचा शोध गुगल वर केला. तेव्हा ते एका गावाचे नाव असल्याचे दिसून आले. हे गाव उत्तरप्रदेश व झारखंड राज्यामध्ये गुगल दर्शवत होते. परंतु बालकांच्या बोलीभाषा यावरुन तो झारखंड वा अन्य राज्यातील असावा, असा तर्क बांधण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास विभाग, बाल न्याय मंडळ, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन यांच्या प्रयत्नाने बालकाच्या परिवाराचा शोध सुरु केला.

शासकीय बालगृहाचे समुपदेशक नंदन शेंडे यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून बालकाला विश्वासात घेत त्याच्याकडुन माहीती जाणून घेतली. बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे व पुन्हा गुगलवर केलेल्या शोधामध्ये टोनीया हे गाव छत्तीसगड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील असल्याचे खात्री झाली. त्यानुसार तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांचाशी  संपर्क साधून संबधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठाणेदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. त्या बालकांचे स्थानिक पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांशी भ्रमणध्वनीव्दारे बोलणे करून दिले असता स्थानीक भाषेत त्यांनी बालकांशी संभाषण करुन माहिती मिळविली. त्यानुसार पोलीस यंत्रणेची तपासाची चक्रे गतिमान झाली व त्या बालकाच्या परिवाराची माहीती मिळाली. स्थानिक पोलिसांनी त्या बालकाच्या पालकांशी संपर्क साधून बालकाची माहिती दिली. हा बालक एक महिन्यापासून त्याच्या परिवाराच्या संपर्कात नव्हता. बालकाची माहिती मिळताच त्यांच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर सर्व सोपस्कार पूर्ण करुन या बालकाला सोमवार दि.२९ रोजी त्याच्या आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने हरविलेल्या बालकाला आईवडीलांचे वात्सल्य पुन्हा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ