गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण व व्यवस्थापनःजिल्हास्तरीय आढावा बैठक - एकात्मिक नियंत्रणावर भर द्यावा-शास्त्रज्ञांचा सल्ला







अकोला,दि. २४(जिमाका)- कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव नियंत्रण व व्यवस्थापनासाठी राबवावयाच्या उपाययोजना एकात्मिक पद्धतीने राबवाव्या, असा सल्ला किटक शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील कृषी यंत्रणेस तसेच शेतकऱ्यांना दिला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.  या एकात्मिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील कपाशीवर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग व प्रेसिंग मालकांनीही पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण व व्यवस्थापनाकरीता जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी डॉ.मुरलीधर इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी एस. एस. शिंदे,  एस. डी. जाधव, विलास वाशीमकर, मंडळ कृषी अधिकारी  पी.ए. राऊत, जी.ए. राऊत, ए.एस.मेश्राम, सी.पी. नावकार, कृषी सेवक, जिनिंग व प्रेसिंग मिल मालक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

                कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजनांची माहिती दिली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा साठवलेल्या कापसातून होण्याची शक्यता असते. जिनिंग प्रेसिंग मध्ये साठवलेल्या कापसात जर बोंड अळीचे अंडे शिल्लक राहून गेले असतील तर पोषक वातावरण मिळताच त्यांचे जीवनचक्र गतिमान होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग मिल, कापूस व्यापारी यांनी आपापल्या परिसरात एकात्मिक व्यवस्थापन करुन योगदान द्यावे. आपापल्या जिनिंग प्रेसिंग मध्ये प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीच्या शेतात प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावावे. त्यात अडकलेले पतंग नष्ट करावे. सरकीतील अळ्या व कोष नष्ट करणे, फेरोमेन सापळ्यातील ल्युर्स वेळचे वेळी बदलणे. तसेच जिनिंग प्रेसिंग मध्ये कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवणे अशा उपाययोजना राबवाव्या, असा सल्ला डॉ. उंदिरवाडे यांनी दिला. त्यांनी सांगितले की, गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन किड नियंत्रणाबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. उंदिरवाडे यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ