जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी सल्लागार समिती बैठक:सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणीसाठी आता ऑनलाईन सुविधा

             अकोला, दि.२५(जिमाका)-गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत  नवीन सोनोग्राफी केंद्रांना नोंदणी व नुतनीकरणासाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्हा स्त्री रुग्णालयात ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. अर्चना फडके, डॉ. वंदना पटोकार, श्रीमती चंद्रप्रभा फुलारी, ॲड. शुभांगी ठाकरे आदी उपस्थित होते.

माहिती देण्यात आली की, सोनोग्राफी केंद्र सुरु करतांना परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच त्याचे नियमित नुतनीकरण तसेच स्थानांतरण, जुने यंत्र विक्री, नवीन यंत्राची खरेदी इ. बाबींसाठी परवाना व परवान्याचे नुतनीकरण अनिवार्य आहे. यासाठी  राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे झालेल्या राज्य पर्यवेक्षकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन सोनोग्राफी केंद्रांना ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.

महाऑनलाईन  तर्फे ही सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महा आय टी या संस्थेच्या मदतीने  http://pcpndtonlineregistration.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे. यात अर्ज हे दोनस्तरीय पद्धतीने तपासले जाणार आहेत. 

पहिल्यास्तरात सोनोग्राफी केंद्रधारक हे  तालुका समुचित प्राधिकारी यांचेकडे ऑनलाईन अर्ज करतील.  या अर्जाची तालुका समुचित प्राधीकारी तपासणी करतील. त्यानंतर हे अधिकारी दुसऱ्या स्तरात जिल्हा समुचित प्राधीकारी यांच्याकडे ऑनलाईन अर्ज सादर करतील. त्यानंतर जिल्हा समुचित प्राधीकारी हा अर्ज मंजूर किंवा नामंजूर करतील. अर्ज मंजूर झाल्यास सोनोग्राफी केंद्र चालकास  डिजीटल स्वाक्षरीद्वारे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. यासंदर्भात सर्व तालुका व जिल्हास्तरीय समिचित प्राधीकाऱ्यांना युजर आयडी उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ