विशेष लेखः- जनावरांतील लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

 







लम्पी त्वचा रोग (लम्पी स्किन डिसीज ) हा रोग इ. स. १९२९ पासून १९८पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर सभोतालच्या इतर देशात शिरकाव केला. मात्र सन २०१३ नंतर या रोगाचा वेगाने सर्वदूर प्रसार झाला आणि आता हा रोग अनेक युरोपीय आणि आशीयाई देशात पसरला आहे.

भारतात लम्पी त्वचा रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात प्रथम या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च २०२० या महिन्यापासून झाला होता. नंतर विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही जिल्ह्यात सुद्धा या रोगाचा  प्रादुर्भाव दिसून आला.

या वर्षी तो गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होऊ नये आणि त्याचा प्रसार महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत शेतकरी / पशुपालक यांना जागृत राहणे आवश्यक आहे.

रोगाची कारणे व प्रादुर्भाव

लम्पी त्वचा रोग हा गोवंश आणि  म्हैस  वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रीप्लॉक्स (CapriPlox) या प्रवर्गात मोडतात. हा एक संसर्गजन्य/ साथीचा आजार आहे. या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साम्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवा होत नाही. ह्या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण  अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील (नर आणि मादी) जनावरात आढळतो. मात्र लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण अधिक असते. उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते. हा रोग उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. मात्र हिवाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो.

या आजाराचा रोग दर हा सर्वसामान्यपणे १०- २०% तर मृत्यूदर १-५% पर्यंत आढळून येतो. आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात, त्यांचे दुग्धउत्पादन मोठ्याप्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गाभण जनावरात गर्भपात होतो आणि प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थीक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खुप विकृत दिसते.

रोगप्रसार

या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराचा प्रसार निरोगी आणि बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणु संक्रमण झाल्यानंतर ते १-२ आठवड्यापर्यंत हा विषाणू रक्तामध्ये राहतो आणि त्या नंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. त्यामुळे नाकातील स्त्राव. डोळ्यातील पाणी आणि  तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा आणि  पाणी दुषित होते. असा हा दुषित चारा पाणी निरोगी पशूंच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा प्रसार होऊन या आजाराची लागण होते. म्हणूनच बाधित जनावरे हि निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक आहे.

त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ अंदाजे  १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतात. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोग याद्वारेही याची लागण होऊ शकते.  गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दुध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातुन आणि स्तनावरील व्रणातून रोगप्रसार होतो.

रोग लक्षणे

बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे २ ते ५ आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावराला मध्यम स्वरूपाचा तर काही वेळेस भयंकर असा ताप येतो. जनावरांच्या डोळ्यातून आणि  नाकातून पाणी येते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते.  लसिकाग्रंथीना सूज येते, जनावरांच्या शरीरावर अंदाजे  २ ते ५ से. मी.  व्यासाच्या कडक आणि  गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इ. भागात येतात. या गाठी कित्येक महिने शरीरावर टिकून राहतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर बऱ्याच कालावधीकरिता अथवा कायमच राहू शकतात. तसेच तोंडात, घशात आणि श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ आणि फोड येतात. तोंडातील पूरळामुळे जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळत असते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.  डोळ्यात व्रण निर्माण होतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते. जनावरांना अशक्तपणा येतो आणि भूक मंदावते, वजन कमी होते. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बांधा पशूंमध्ये होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

निदान आणि उपचार

या आजाराचे निदान लक्षणावरून आणि पूर्वइतिहासावरून करता येते. पण अशाप्रकारचे लक्षणे इतर रोगांमध्ये दिसून येतात. त्यामुळे  पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेमार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणी करिता रक्त, रक्तजल, त्वचा इ. नमुने घेणे आवश्यक आहे.

हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर प्रभावी असा उपचार उपलब्ध नाही परंतु बाधा झालेल्या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जीवाणूजन्य आजारांची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने  उपचाराकरिता प्रतिजैविके,  तापनाशक, दाहनाशक, वेदनाशामक, अँटीहिस्टेमिनिक  औषधे, रोग प्रतिकारशक्तीवर्धक जीवनसत्व अ, ई आणि बी, शक्तीवर्धक यकृत टॉनिक, इ. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरुवातीपासून ५-७ दिवस उपचार  केल्यास बहुतांशी जनावरे पुर्णपणे बरी होतात. तसेच त्वचेवरील व्रणासाठी जंतुनाशक मलम  (अँटिसेप्टिक) / फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करून करावा लागतो. तोडांत व्रण असल्यास तोंड पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यानी धुवून बोरोग्लीसरीन लावावे. जनावरांना मऊ आणि हिरवा चारा तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.

रोगनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना

हा संसर्गजन्य रोग असल्याने रोग आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार लम्पी स्कीन डिसीज या रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मुलन करण्यासाठी जिल्हा  स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी लागते.

·         हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लंम्पी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.

·         निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे. बाधित आणि निरोगी जनावरे एकत्रित चरायला सोडू नये. तसेच गायी आणि म्हशी एकत्र बांधू नये, म्हशींना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी.

·         साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे आणि मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा.

·         बाधित परिसरात स्वच्छता करावी आणि निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २% यांचा वापर करता येईल.

·         या रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करावी. तसेच बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. गोठा आणि परिसर स्वच्छ हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही यांची दक्षता घ्यावी.

·         सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही मात्र शेळ्यात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो. बाधित गावांमध्ये आणि बाधित गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय आणि म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे.

·         प्रादुर्भावग्रस्त भागात तसेच १० किमी. परिघातील जनावरांचीने आण वाहतूक बंदी आणावी तसेच जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने बंद ठेवण्यात यावे

·         शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणच्या पाण्याने धुवून घ्यावेत किंवा सॅनिटायझरने साफ करून घ्यावेत

·         या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

·         योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.

-         लेखकःप्रा. डॉ. सुनील वाघमारे, डॉ. धनंजय दिघे आणि डॉ. महेश इंगवले

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ