पोळा सण; नदी नाल्यावर जाऊ नये - प्रशासनाचे आवाहन

 

अकोला दि. 25 (जिमाका) : प्रादेशिक हवामान केंद्राच्या संदेशानुसार जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नदी नाले, तलाव, धरणे, लघुप्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. पोळा सणाच्या अनुषंगाने नागरिकांनी नदी नाल्यावर जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहायक अधिक्षक अतुल सोनवणे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प 88.24, टक्के दगडपारवा प्रकल्प 94.01 टक्के, वान 72.27 टक्के हे पूर्ण क्षमतेने भरले असून प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केल्या जाऊ शकतो. तसेच मोर्णा प्रकल्पातून 15.37 क्युसेक विसर्ग सुरु आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पातून 2.52 विसर्ग सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील पुर्णा, सपन, शहाणूर, चंद्रभागा प्रकल्पातून पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या भागामध्ये पाऊस झाल्यास केव्हाही विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे पूर्णा नदीस मोठ्या प्रमाणात पूर कायम राहील. अशा स्थितीत पूर्णा नदीमध्ये बैल घेऊन बैलांना आंघोळ करण्याचा प्रयत्न करू नये. अतिशय गतीने असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नदी नाले, तलाव, धरणे, लघुप्रकल्पामध्ये पोहण्याचा किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये. पाण्यामध्ये वाहून जाण्याच्या /बुडण्याचा धोका आहे. त्यानुसार पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दक्षता घेण्याबाबत जिल्ह्यातील नागरीकांना जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ