तेजस्विनी प्रदर्शनाचे उद्घाटन; महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यवस्था उभारणार- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 









अकोला दि.24(जिमाका)- महिलांमध्ये हुशारी, संयम,  चिकाटी, कला-कौशल्य या सोबतच प्रामाणिकपणाही असतो. त्यामुळे महिलांनी उत्पादीत वस्तुंचा ‘तेजस्विनी’ हा ब्रॅण्ड व्हावा. तसेच त्यांच्या उत्पादनांसाठी शहरात विक्री व्यवस्था उभारण्यासाठी चांगल्या जागा निश्चित करु, अशा शब्दात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महिलांना आज आश्वस्त केले. या प्रदर्शनास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिताताई अढाऊ यांनीही भेट देऊन महिलांचा उत्साह वाढविला.

महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने जिल्हास्तरावर महिला बचत गटाव्दारे उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सव ‘तेजस्विनी’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. येथील स्वराज भवन मैदानावर हे प्रदर्शन सुरु झाले आहे. यावेळी माविमंचे क्षेत्रिय संनियंत्रक केशव पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहायक आयुक्त जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द.ल.ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माविमंच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोबरागडे,  कल्पना निचाळे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळील फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन  करण्यात आले.

आपल्या भाषणात जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, चांगल्या व उत्साही वातावरणात हे प्रदर्शन पार पडत आहे.  महिला आर्थिक विकास महामंडळाची क्षमता ही अधिक आहे. महिलांच्या उत्पादनांची विश्वासार्हता व गुणवत्ता ही अन्य कोणत्याही वस्तूंपेक्षा अधिक असते. म्हणूनच तेजस्विनी हा एक ब्रॅण्ड व्हावा. महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना  विक्रीसाठी शहरात कायमस्वरुपी चांगल्या व मोक्याच्या जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शिवाय ग्रामिण भागातून शहरात ही उत्पादने आणणे त्यांची वाहतुक व्यवस्था इ. बाबींचा समावेश असणारा एक सर्वंकष आराखडा आपण तयार करु, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

तेजस्विनी हे प्रदर्शन दि.26 पर्यंत तीन दिवस स्वराज भवन च्या मैदानावर होत असून  बचत गटाव्दारे उत्पादित वस्तूंची अधिकाधिक विक्री व्हावी व बचतगट चळवळीला चालना मिळून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वाव मिळावा, यासाठी हे प्रदर्शन आहे. त्यात वस्तू, पदार्थांची विक्री होणार आहे. हे सर्व पदार्थ कृत्रिम रसायने विरहित, घरगुती आहेत. दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत. यात कारागिर महिला, सुगरण महिलांच्या कौशल्य व कलाकुसरीचा प्रत्यय येतो. तसेच या तीन दिवसीय कार्यक्रमात तज्ज्ञांची व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानी हा लाभ नागरिकांना होणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ