जागतिक महिला दिन ; अबला नव्हे; स्वतःला ‘सबला’ समजा- जिल्हाधिकारी निमा अरोरा : जिल्हाधिकारी कार्यालयात बचतगटांचे स्टॉल्स, महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम

                       
























अकोला दि.८ (जिमाका)- आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा व स्वतःला ‘सबला’ समजा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज समस्त महिला वर्गाला केले.

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, प्रतिक्षा तेजनकर. माविमच्या वर्षा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शनासाठी  काजल राजवैद्य, कायदेविषयक मार्गदर्शनासाठी  ॲड. संगिता भाकरे, महिला सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शनासाठी  दीपिका देशमुख या उपस्थित होत्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग द.ल. ठाकरे, तसेच विविध विभागप्रमुख सर्व महिला कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांच्या महिला सदस्य आदी उपस्थित होते.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. महिलांच्या आरोग्यविषयक डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी माहिती दिली. जयश्री दुतोंडे यांनीही उपस्थित महिलांशी हितगुज केले. जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, ज्या दिवशी आपल्या कामाची दखल कुणीतरी घ्यावी याची आवश्यकता आपणास भासणार नाही त्यादिवशी आपण स्वावलंबी झालो असे समजावे.  गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला ह्या काहीच करत नाहीत असे कुणीही समजू नये. अर्थशास्त्रातही आता गृह अर्थशास्त्र म्हणून संकल्पना मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कमावत्या पुरुषाच्या बरोबरीने व समांतर उत्पादक काम गृहिणी करत असते, असेही त्यांनी सांगितले. स्वतःच्या आवडीने काम करावे व आपल्या कामाची गुणवत्ता आपणच ठरवावी,असेही त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले.

प्रास्ताविक प्रतीक्षा तेजनकर यांनी तर सूत्रसंचालन वर्षा भुजाडे यांनी केले.

बचतगटांच्या स्टॉल्सला प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महिला स्वयंसहायता बचतगटाच्या उत्पादन विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग द.ल. ठाकरे, वर्षा भुजाडे, अधीक्षक शिल्पा बोबडे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ५२ स्टॉल्स लावण्यात आले होते. याठिकाणी मान्यवरांनी भेटी देऊन उत्पादनांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच महिला दिनानिमित्त केक कापण्यात आला. दिवसभर महिलांची विक्री प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होती.   

जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग तपासणी शिबीर

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या स्तन कर्क रोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 63 महिलांचे स्तन कर्करोगांचे स्किनिंग करण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केल्या जाईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.‍मिनाक्षी गजभिये यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ