बेवारस रुग्णाची शस्त्रक्रिया, देखभाल आणि कुटुंबियांशी पुनर्भेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची सहृदयता



अकोला,दि.31(जिमाका)-  एक व्यक्ती अचानक बार्शीटाकळी रेल्वेस्थानकावर जखमी अवस्थेत आढळतो. तो बेवारस म्हणूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेल्वे पोलिसांमार्फत दाखल होतो. डोक्याला मार लागल्याने त्याला काहीच आठवत नाही. महिनाभराचा उपचार,सुश्रूषा, समुपदेशनानंतर तो पूर्ण बरा होतो, आता प्रश्न येतो त्याला सोडायचे कुठे? दरम्यान त्याला काहीही आठवत नाही. पण सारखा आईकडे जायचे असा पाढा लावलेला. आणि मग सुरु होते एक तपास यात्रा आणि आई लेकराची भेट पुन्हा घडवित अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सहृदयतेचा प्रत्यय देतात.

बार्शीटाकळी येथील रेल्वेस्थानकावर दि.26 फेब्रुवारी रोजी एक 40 वर्षीय रुग्ण जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर असल्याचे निदर्शनात आले. हा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता त्याच्या डोक्याला व शरीराच्या बऱ्याच भागात गंभीर जखमा झाल्या होत्या.  रेल्वे पोलीसांनी त्या रुग्णाला तातडीने उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलीसांच्या तत्परतेने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयत्नाने त्या रुग्णाचा जीव वाचविण्यात आला.

दाखल झाला त्यावेळी या रुग्णाची अवस्था बिकट होती. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला आपले नाव व पत्ता तसेच नातेवाईकांची माहिती सांगता येत नव्हती. बराच मार लागल्यामुळे त्याला त्या वेदना असह्य होत होत्या. तो प्रचंड चिडचिड व आरडाओरड करत होता. तथापि, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी विभाग, अस्थिव्यंगोपचार व मनोविकृती अशा सर्व विभागांनी या रुग्णावर आवश्यक तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया केल्या. तब्बल एक महिन्याने हा रुग्ण पूर्ण बरा झाला. मुळात या रुग्णाला अपस्मार हा आजार होता. त्यामुळे त्याचेवर हा प्रसंग गुदरला असावा.

जीव वाचला पण अपघातामुळे या रुग्णाला स्वतःची ओळख नव्हती. त्याला पुढील पुर्नवसनासाठी समाजसेवा अधिक्षक अमोल शेंडे यांच्याकडे पाठविण्यात आले. समुपदेशनादरम्यान हा रुग्ण  वारंवार घरी जाण्याचा आग्रह करित होता. मात्र त्याला घरचा पत्ता आठवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कोणत्याही नातेवाईकाशी संपर्क करता येत नव्हता. साहजिकच  त्याला घरी कसे पाठवयाचे? हा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी बार्शीटाकळी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी रुग्णाची विचारपूस केली. त्याच्याकडून जमा करण्यात आलेल्या एका चिठ्ठीच्या आधारे  हा रुग्ण उत्तरप्रदेशातील इलाहाबाद जिल्ह्यातील  असल्याचा धागा गवसला. त्यांनी तेथील पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला. अखेर हा तरुण मोहम्मद आरीफ मोहम्मद अख्तर रा. गुलारीया पो.फुलपूर, ता. हांडीया या गावातील असल्याचे उत्तरप्रदेश पोलीसांनी खात्रीपूर्वक सांगितले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या रुग्णाच्या आईसोबत संपर्क साधुन रुग्णाशी बोलणे करुन दिले. तिकडे गेल्या महिन्याभरापासून हा बेपत्ता असल्याने त्याची आई, भाऊ आणि नातेवाईक त्याचा शोध घेत होते. महिन्याभरानंतर त्याचा शोध लागला, त्याची आई, भाऊ, नातेवाईक आनंदीत झाले. त्याची आई, भाऊ व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.अथक प्रयत्नानंतर रुग्णाची त्याच्या परिवाराशी भेट घडवून आणली.  रुग्णालय प्रशासनाच्या सहृदयतेचा हा परिचय यानिमित्ताने झाला.  या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याच्या अपस्मार आजाराबाबत माहिती असल्याने त्यांनी त्याच्या खिशात संपुर्ण पत्ता लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती. तिच पोलिसांनी जपून ठेवली होती. त्यावरुनच सर्व उलगडा झाला.

            या रुग्णाची देखभाल करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक भुपेन्द्र पाटील, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ.गजेन्द्र  रघुवंशी, डॉ.अमित जाधव, डॉ.आकाश, अधिसेविका ग्रेसी मारीयान, समाजसेवा अधीक्षक अमोल शेंडे, परिचारीका यांनी विशेष परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ