विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी









 अकोला दि.२८(जिमाका)- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज अकोला मनपाच्या नायगाव येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प व कचरा डेपोची तसेच शहरातील नेहरू पार्क जवळ अपघातप्रवण स्थळाची पाहणी केली.

अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती निधी पाण्डेय या आज अकोला दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या  नायगाव येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच कचरा डेपो येथे भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर,  कनिष्ठ अभियंता प्रतिक कोकाटे, स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोरकर आदी उपस्थित होते.

नायगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे स्थलांतर भोळ येथे लवकरात लवकर करता यावे यासाठी गतिने कामे पूर्ण करा, असे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले. भोळ येथे  मनपाच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्पावर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या २३० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून यंत्रसामुग्रीही दाखल होत आहे. संकलित होणाऱ्या घनकचऱ्यातून ६० टक्के खत निर्माण होणार आहे. ४५.३५ कोटी रुपये खर्च करुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

त्यानंतर डॉ. पाण्डेय यांनी शहरातील नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी केली. तेथे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा,सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे हे ही उपस्थित होते. रहदारीची कोंडी न होता अपघात शक्यतांचे निर्मूलन व्हावे, यासाठी तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना याबाबत आयुक्तांना माहिती देण्यात आली.

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे प्राणी उपचार केंद्र येथेही डॉ.पाण्डेय यांनी भेट दिली. तेथे पाळीव जखमी प्राणी. पक्षी यांच्यावर सेवाभावी संस्थेमार्फत मोफत उपचार व देखभाल केली जाते. या केंद्रास भेट देऊन त्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ