शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली प्रथमच कर्करोग शस्त्रक्रिया


अकोला दि.९(जिमाका)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक आणि घसा विभागात प्रथमच कर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा भाग म्हणून कर्करोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोलाच्या कान, नाक आणि घसा विभागात  एक ५७ वर्षीय महिला रुग्ण दाखल होती. या महिलेच्या चेहऱ्यावर डाव्या भागात एक गाठ होती. पॅथॉलॉजी विभागातील तपासण्यांच्या नंतर ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. तथापि, ही गाठ त्वचेशी निगडीत होती. त्यावर शस्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यानुसार कान, नाक व घसा तसेच सामान्य रुग्ण विभाग व कर्करोग अशा शाखांनी संयुक्तपणे आयोजित कार्यशाळेत ही शस्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया कान, नाक, घसा शास्त्र विभागाच्या  शल्यक्रिया गृह येथे पार पडली. कर्करोग विशेषज्ञ डॉ. अमित बागडिया, सहयोगी प्राध्यापक डॉ. रवि खंडारे, कान, नाक, घसा शास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश्री चौरपगार, बधिरीकरण शास्त्र विभागप्रमुख  डॉ. गणेश राठोड, डॉ. गजानन ढाकणे, यांनी व पदव्युत्तर विद्यार्थी, आंतरवासिता विद्यार्थी यांनी या शस्त्रक्रिया कार्यशाळेत सहभाग दिला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम आहे,असे डॉ. गजभिये यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ