एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : कांदाचाळीमुळे मिळाली शाश्वत उत्पन्नाची हमी

 



 अकोला दि.२७ (जिमाका)- एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत खेर्डा बु. येथील शेतकरी दिनेश अवचितराव काकड यांनी कांदाचाळ उभारली आहे. बाजारभावातील चढ-उतार पाहता आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कांदा पिकाची शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करता यावी, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कांदा चाळ उभारणी आवश्यक ठरते. त्यासाठी शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाते.

कांद्याची शास्त्रशुद्ध साठवण

खेर्डा बु. येथील शेतकरी दिनेश अवचितराव काकड यांनी आपल्या शेतात कांदा चाळ उभारली. सन २०२२-२३ साठी त्यांना ८६ हजार ८३ रुपये इतके अनुदान मिळाले. त्यांनी दीड हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली आहे. कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतार पाहता कधी कधी लागवड खर्च ही निघण्याची शाश्वती बाळगता येत नाही. अशावेळी पडत्या दराने पिक विकण्यापेक्षा ते साठवून ठेवणे अधिक योग्य.  त्यासाठी काकड यांनी ही चाळ उभारली आहे. पिकाचे काढणीत्तोर व्यवस्थापन होणे आवश्यक असते. त्यासाठीही कांदाचाळ अत्यावश्यक असून शेतकऱ्यांना मालाची प्रतवारी करणे, विरळणी करणे शक्य होते. कांदाचाळ ही कांदा साठवणूकीची शास्त्रीय पद्धत म्हणून सर्वश्रृत आहे.

२५ मे.टन कांद्याची साठवण

 या चाळीत २५ मेट्रिक टन इतका कांदा साठवता येणार आहे. ही चाळ त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेली असल्याने त्यात कांदा साठवण, त्याची प्रतवारी करणे, शिवाय वाहतुकीसाठी वाहन नेण्याइतपत जागा त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे वाहनात माल भरणे, काढणे इ. कामे सुलभ पद्धतीने करता येतात.  यंदाही त्यांनी कांदा पिक घेतले आहे. उत्पादित कांदा सध्या चाळीत ठेवणार आहेत. योग्य बाजार भाव आल्यावर विक्री करणार आहेत. साहजिकच पिकवलेल्या मालाचा योग्य भाव मिळाल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा भाग म्हणून ही योजना राबविली जाते. वैविध्यपूर्ण हवामान विभागानुसार प्रादेशिक  अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागात फलोत्पादनाला चालना दिली जाते. त्यात संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, विस्तार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा देऊन समुह पद्धतीने विकास केला जातो. यात शेतकऱ्यांचे एकत्रिकरण करणे हा महत्त्वाचा घटक आहे.  त्याद्वारे फलोत्पादनात वाढ करणे, उत्पन्नात वाढ करुन आहार विषयक सुरक्षा बळकट करण्यात येते.यात सुक्ष्म सिंचनाला चालना दिली जाते. जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती असून त्यासमितीमार्फत योजनेचा प्रसार व शेतकऱ्यांची निवड करणे आदी बाबी करण्यात येतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी दिली. कांदा चाळ ही बाब काढणीत्तोर व्यवस्थापन म्हणून या योजनेत समाविष्ट आहे,असेही त्यांनी सांगितले.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ