रस्ता सुरक्षा समिती बैठक; जादाभार, बेशिस्त पार्किंग, फॅन्सी व अप्रमाणित दिवे बसविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

 




अकोला दि.१०(जिमाका)- रस्ता वाहतुक सुरक्षीत होण्याच्या दृष्टीने क्षमतेपेक्षा जादा भार वाहणारी वाहने, बेशिस्त पार्किंग तसेच अप्रमाणित वाहन दिवे वापरणारे वाहन चालक व मालकांवर कारवाई करुन दर आठवड्याला अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता सरनाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पी.डी. पाटील. पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यात महामार्ग व अन्य प्रमुख मार्गांवर असणारे अपघातप्रवण स्थळांवर दिशानिर्देशक फलक लावण्यात आल्याबाबत अहवाल सादर करण्यात आला. रस्त्यांची अस्वस्था चांगली रहावी यासाठी अतिभारीत (ओव्हरलोडेड) वाहनांची वाहतुक होता कामा नये. त्यामुळे अतिभारीत वाहनांवर कारवाई परिवहन विभागाने करावी, असे निर्देश देण्यात आले.

रात्रीच्या वेळी वाहनांना अप्रमाणित दिवे वापरल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी अतिप्रकाश देणारे दिवे(एलईडी), दिव्यांची उंची, फॅन्सी दिवे बसवणे इ. कारणांमुळे समोरुन येणाऱ्या वाहनचालकास दृष्टीबाधानिर्माण होऊन बऱ्याचदा अपघात घडतात. त्यामुळे अप्रमाणित दिवे बसवलेल्या वाहनधारकांवर कारवाई करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले.

अवैध पार्कींग, नियोजित पार्कींग स्थानाव्यतिरिक्त केलेले पार्कींग यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत असतात. पार्कींगच्या जागा शहरात नक्की करुन त्यावर पार्कींग करण्याबाबत वाहतुक पोलिसांनी अंमलबजावणी करावी. तसेच ज्या शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. त्याशाळांच्या समोरील वाहतुक व्यवस्था सुरक्षित होण्यासाठी गतिरोधक टाकणे, पांढरे पट्टे मारणे इ. उपाययोजना राबवाव्या.

तसेच शहरातील अपघातप्रवण स्थळांवर वाहनांचे वेग मर्यादित राहण्याबाबत उपाययोजना कराव्या,असे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले. शहरातील पेट्रोल पंपावर आत शिरणे व बाहेर पडण्याच्या जागी रम्बल स्ट्रिप टाकणे आवश्यक आहे, याबाबतही आढावा घेऊन कारवाई करावी,असेही निर्देश देण्यात आले. शहरातील वाहतुकीच्या नियमनासाठी मनपा, वाहतुक पोलीस , परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे शहरात सर्व्हेक्षण करुन फलक लावणे, पट्टे मारणे इ. संयुक्त कारवाई करावी,असे निर्देश देण्यात आले.

००००००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ