अवकाळी पाऊस; संयुक्त पंचनामे प्रगतिपथावर:नैसर्गिक आपत्तीचे गांभिर्य ओळखून वेळेत पंचनामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी

 









 अकोला दि.२०(जिमाका)- जिल्ह्यात नुकत्याच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्यानुकसानीचे संयुक्त पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिले आहेत. संपकाळात नैसर्गिक आपत्ती ध्यानात घेऊन कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संयुक्त पंचनामे पूर्ण करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या दि.६ पासून वेगवेगळ्या दिवशी विविध क्षेत्रात अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसत आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात बार्शी टाकळी, पातूर, तेल्हारा या तीन तालुक्यात या आपत्तीची झळ बसली आहे. त्यात बार्शी टाकळी तालुक्यातील १०, पातूर तालुक्यातील २३ तर तेल्हारा तालुक्यातील १७ अशा एकूण ५० गावांमध्ये नुकसान झाले आहे. तीनही तालुके मिळून ३७२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यात दिसून आले आहे. एकूण ३४७६.१७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत १९ गावांचे पंचनामे पुर्ण असून १२३७ शेतकऱ्यांचे ७९७.१७ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त भागात महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे पुर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज सकाळी आढावा बैठक घेतली. नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग लक्षात घेऊन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी आपले पंचनाम्याचे काम वेळेत पुर्ण करावे व यंत्रणांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर झालेल्या परिणामांबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात आरोग्य सेवा, अत्यावश्यक सेवा यांबाबत आढावा घेण्यात आला. अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्भवलेली कामे यंत्रणेने वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी नुकसानग्रस्तांच्या शेतात

दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी गारपीटग्रस्त भागाची आज सायंकाळी पाहणी केली. पातूर तालुक्यात दि.१७ व १८ मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते.भेटी दरम्यान पातूर तहसीलदार  दीपक बाजड, तालुका कृषी अधिकारी पातूर,  मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी धीर दिला. तसेच तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेशीत केले. यावेळी मौजे आस्टुल,कोठारी खु, कोठारी बु,आस्टूल, पास्टूल शिवार या शिवारात त्यांनी सायंकाळी उशीरापर्यंत पाहणी केली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ