नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प: 'महागाव'मध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून घडले परिवर्तन

 








 अकोला दि.२५(जिमाका)- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यात महागाव येथे  शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक गट स्थापन करुन त्यामाध्यमातून शेतीला शेतमाल प्रक्रिया उद्योगाची तसेच सामुहिक शेतीची जोड देऊन परिवर्तन घडविले आहे.

महागाव येथे आत्मा अंतर्गत  गुरुकृपा हा शेतकरी उत्पादक गट आहे. या शेतकरी उत्पादक गटाला नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाअंतर्गत गोदाम बांधणे आणि दाल मिल या दोन बाबींसाठी अनुदान देण्यात आले. त्यात गोदाम बांधकामासाठी १२ लाख तर दालमिल साठी  ८ लाख रुपये इतके अनुदान शेतकरी गटाला देण्यात आले.

एक गोडावून;त्याचे फायदे अनेक

या अनुदानातून गावात सुसज्ज गोडावून बांधण्यात आले आहे. या शेतकरी गटाचे सभासद शेतकरी आपल्या शेतातील उत्पादीत माल याठिकाणी साठवून ठेवतात. त्यासाठी त्यांना कोणताही दर आकारला जात नाही. या सर्व मालाची नोंद ठेवली जाते. शेतमाल उत्पादित झाल्यानंतर लगेचच बाजारात भाव मिळत नाही, असे बऱ्याचदा घडते. अवकाळी पाऊस, गारपीट,वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीतही शेतात उघड्यावर माल ठेवल्यानंतर तो माल खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी शेतमाल गोदामात सुरक्षित तर ठेवता येतोच शिवाय बाजारात  योग्य भाव मिळाल्यास तेव्हा विक्रीसाठीही नेता येतो. एकाच गोदामात अनेक शेतकऱ्यांचा माल उपलब्ध असल्याने व्यापारी थेट गावात येऊनच माल विकत घेऊन जातात. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचतो. असे या गोदामामुळे शेतकऱ्यांना फायदे होत आहेत. सध्या या गोडावून मध्ये तूर, हरभरा, गहू साठविण्यात आला आहे.

दालमिल मुळे शेतीमाल प्रक्रिया शक्य

याच गटाला दालमिलसाठीही अनुदान देण्यात आले असून दालमिल उभारण्यात आली आहे. या भागात बरेच शेतकरी हे तूर, हरभरा, उडीद, मुग असे डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेत असतात. या शेतकऱ्यांना आता आपला माल बाजारात विकतांना तो प्रक्रिया करुन डाळीच्या भावाने विकता येणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार हे नक्कीच.

एकत्रित पद्धतीने 'कांदा बी उत्पादन'

या गटाच्या शेतकऱ्यांनी कांदा बी उत्पादक कंपनीशी करार करुन  ३० एकर क्षेत्रावर कांदा बी लागवड केली आहे. एका एकरात ५ क्विंटल बी उत्पादन होते. एका क्विंटल ला ४५ हजार रुपये या दराने त्याला भाव मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी जवळपास  दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पादन घेईल. एकत्र व गटाने शेतकरी संघटीत असल्याने त्यांना हे शक्य झाले.

'शेडनेट'द्वारे संरक्षित पिकांचे उत्पादन

याच गटाचे एक शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांना शेडनेट साठी ८ लाख १५ हजार रुपये इतके अनुदान मिळाले आहे. त्यातून त्यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावर संरक्षित पिकांचे उत्पादन घेतले. त्यात प्रामुख्याने त्यांनी  उन्हाळी काकडी, शिमला मिरची या पिकाची लागवड केली व उत्पादन घेतले.  या पिकांसाठी त्यांनी बाजारपेठ संपर्क प्रस्थापित केला होता.  त्यातून त्यांना एकूण साडे तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ