ई-प्रमाण सेवा : नोंदणीकृत दस्ताच्या प्रती घरबसल्या मिळणार वेळ, कष्ट व खर्चाची होणार बचत
सेवा संकल्प
ई-प्रमाण सेवा : नोंदणीकृत दस्ताच्या
प्रती घरबसल्या मिळणार
वेळ, कष्ट व खर्चाची होणार बचत
अकोला, दि. २४ : नोंदणी व मुद्रांक
विभागामार्फत नागरिकांना नोंदणीकृत दस्तांच्या प्रमाणित प्रती सहज, जलद व पारदर्शक
पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 'ई-प्रमाण डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेमुळे नागरिकांना केवळ
प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता कमी होऊन
वेळ, प्रवासाचा खर्च व मनुष्यबळाची बचत होणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी
संजय चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील नऊ नोंदणी कार्यालयांमार्फत
नागरिकांना नोंदणीविषयक विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करून नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने ई-प्रमाण सेवा
महत्त्वाची ठरत आहे.
व्यावसायिकांनाही सुविधा
ई-प्रमाण सेवेचा लाभ केवळ सामान्य
नागरिकांनाच नव्हे, तर विधिज्ञ, सनदी लेखापाल, दस्तलेखक, बँका व वित्तीय संस्था, न्यायालयीन
कामकाजाशी संबंधित व्यक्ती, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील
संस्था तसेच मालमत्ता व दस्तऐवजांचा शोध घेणाऱ्या लीगल, टायटल सर्च फर्म्स यांनाही
घेता येणार आहे. विशेषतः मालमत्तेच्या व्यवहारापूर्वी मालकी हक्काची तपासणी, पूर्वीचे
व्यवहार, बोजा/हक्काशी संबंधित नोंदी, दस्तांची पडताळणी, बँक कर्ज प्रकरणे, न्यायालयीन
प्रकरणे व टायटल सर्च यासाठी आवश्यक असलेल्या नोंदणीकृत दस्तांच्या प्रमाणित प्रती
मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
न्यायालयीन कामकाजासाठी उपयुक्त
मालमत्ता वाद, दिवाणी प्रकरणे,
वारसाहक्क, खरेदी-विक्री व्यवहार, गहाणखत, हक्कसोडपत्र, वाटणीपत्र, मुखत्यारपत्र, विकास
करार, भाडेपट्टा आदी विविध व्यवहारांशी संबंधित नोंदणीकृत दस्तांच्या प्रती अनेक वेळा
आवश्यक असतात. अशा वेळी ई-प्रमाण सेवेमुळे संबंधित व्यक्ती किंवा त्यांचे विधिज्ञ प्रतिनिधी
यांना प्रमाणित प्रत मिळविण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त होणार आहे.
बँका व वित्तीय संस्थांसाठीही
महत्त्वाची सुविधा गृहकर्ज, मालमत्ता तारण, कर्जवसुली, मालमत्तेच्या हक्काची तपासणी,
बँक मॉर्गेज तसेच इतर वित्तीय व्यवहारांमध्ये नोंदणीकृत दस्तांची पडताळणी आवश्यक असते.
त्यामुळे बँका व वित्तीय संस्थांना
आवश्यक दस्तांच्या प्रमाणित प्रती डिजिटल माध्यमातून प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध
झाल्याने कर्ज प्रक्रियेत होणारा वेळ कमी करण्यास मदत होऊ शकते.
लीगल सर्च व टायटल तपासणी
अधिक सुलभ
मालमत्तेचा व्यवहार करण्यापूर्वी
संबंधित मालमत्तेचा पूर्वइतिहास तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे विधिज्ञ,
टायटल सर्च करणारे व्यावसायिक व लीगल फर्म्स यांच्यासाठी नोंदणीकृत दस्तांच्या प्रमाणित
प्रती डिजिटल पद्धतीने मिळण्याची सुविधा उपयुक्त ठरणार आहे. यामुळे कार्यालयीन फेऱ्या
कमी होऊन दस्तऐवज तपासणीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल.
ई-सर्च सुविधेचाही उपयोग
आवश्यक दस्ताची माहिती शोधण्यासाठी
उपलब्ध ई-सर्च सुविधेचा नागरिक व संबंधित व्यावसायिकांना उपयोग करता येईल. आवश्यक माहिती
उपलब्ध झाल्यानंतर ई-प्रमाण सेवेद्वारे प्रमाणित प्रत मिळविण्याची प्रक्रिया करता येते.
डिजिटल प्रमाणित प्रत सुरक्षित
व विश्वासार्ह दस्तऐवज
डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या
प्रमाणित प्रतींमुळे दस्तऐवज हाताळणी, प्रत मिळविण्यासाठी होणारी प्रतीक्षा आणि कार्यालयीन
ये-जा यामध्ये बचत होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी डिजिटल सेवेचा वापर करताना अधिकृत
विभागीय पोर्टलचाच वापर करावा तसेच आपली वैयक्तिक माहिती व व्यवहाराशी संबंधित माहिती
अनधिकृत व्यक्ती किंवा संकेतस्थळावर देऊ नये.
नोंदणी विभागाच्या सेवा अधिकाधिक
नागरिकाभिमुख, पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल करण्यावर भर देण्यात येत आहे. ई-प्रमाण सेवेमुळे
नागरिक, विधिज्ञ, बँका, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित व्यक्ती तसेच लीगल सर्च करणाऱ्या
व्यावसायिकांना नोंदणीकृत दस्तांच्या प्रमाणित प्रती मिळविणे अधिक सोपे होईल.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी प्रमाणित दस्ताची प्रत
मिळविण्यासाठी शक्य तेथे ई-प्रमाण डिजिटल सेवेचा लाभ घ्यावा, कार्यालयीन कामकाजासाठी
अनावश्यक प्रत्यक्ष फेऱ्या टाळाव्यात आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील
अद्ययावत सूचना व शुल्क यांचीच खात्री करावी, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे
मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा