दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबतची बातमी चुकीची ; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

 दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबतची बातमी चुकीची

जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण


   अकोला, दि. 21 :               राज्यातील तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी पूर्णपणे असत्य, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे. राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत दुष्काळग्रस्त तालुक्यांची कोणतीही अधिकृत यादी किंवा घोषणा झालेली नाही. शासनाकडून अधिकृत यादी जाहीर होताच ती तात्काळ सर्व माध्यमांपर्यंत पोहोचवली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

 

      जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असणारी ट्रिगर तपासणी, पर्जन्यमानाचे विश्लेषण, पीकस्थिती अहवाल आणि विविध निर्देशांकांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया विविध विभागामार्फत सुरू आहे. दुष्काळ घोषित करण्याचा अंतिम अधिकार हा राज्य शासनाचा असून, संबंधित विभागांकडून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावरच अधिकृत यादी प्रसिद्ध केली जाईल. 


      जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नागरिक व माध्यम प्रतिनिधींनी कोणत्याही अप्रमाणित बातमीवर अथवा माहितीवर विश्वास ठेवू नये, अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम ठेवावा, माहितीची सत्यता केवळ शासनाच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 


     अल निनो व दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर 'शेतकरी मदत कक्ष' तातडीने स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी क्षेत्रिय यंत्रणेला दिले आहेत. 

00000





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन