तापडिया नगर उड्डाणपुलाच्या पिलर्सबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खंडन

 

तापडिया नगर उड्डाणपुलाच्या पिलर्सबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खंडन

अकोला, दि. २२ : न्यू तापडिया नगर परिसरातील उड्डाणपुलाच्या चार पिलर्सची जमीन सरकल्याबाबत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर वृत्त वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उड्डाणपुलाच्या स्लॅब व खांबांचे बांधकाम करताना जमिनीवर स्टेजिंग उभारण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काँक्रीट प्लॅटफॉर्म तयार करण्यात येतो. बांधकामाचा संबंधित टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा तात्पुरता प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात येतो. सदर प्रक्रियेचा व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने प्रसारित झाल्यामुळे पिलर्सची जमीन सरकल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्पष्ट केले की, उड्डाणपुलाचे सर्व पिलर्स सुरक्षित असून कोणताही पिलर दबलेला अथवा जमिनीत सरकलेला नाही. बांधकामाची कार्यपद्धती आणि तात्पुरत्या स्टेजिंग प्लॅटफॉर्मची माहिती नसल्यामुळे सदर बाबीचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले.

उड्डाणपुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, संरचनात्मक सुरक्षितता आणि तांत्रिक निकष यांची आवश्यक ती तपासणी करूनच काम करण्यात येत असून, नागरिकांनी अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर आधारित वृत्तांवर विश्वास ठेवू नये. येत्या ६ महिन्यात उड्डानपुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन