'सेवा संकल्प अभियान': अकोला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष त्रुटी पूर्तता शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांसाठी विशेष खिडकी सुरू २१ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान शिबिरांचे आयोजन

 

'सेवा संकल्प अभियान':

अकोला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष त्रुटी पूर्तता शिबिरांचे आयोजन;

विद्यार्थ्यांसाठी विशेष खिडकी सुरू

२१ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान शिबिरांचे आयोजन

 

अकोला, दि. २३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि 'सेवा परमोधर्म' या उक्तीनुसार नागरिकांपर्यंत शासकीय सेवा सुलभतेने पोहोचविण्याच्या उद्देशाने संपूर्ण राज्यात 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला कार्यालयाच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्रांसंबंधात त्रुटी पूर्ततेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा आणि शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी घेऊन आपल्या जात पडताळणी प्रकरणांची लवकरात लवकर पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी डॉ. मनोज मेरत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

कार्यालयीन पत्रानुसार , दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान सुरू राहणार असून, त्या अंतर्गत त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या पूर्ततेसाठी सलग दि. २१ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर पर्यंत दररोज शासकीय सुट्टया वगळून विशेष शिबीर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, अकोला या ठिकाणी होणार आहेत.

 

इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेले विद्यार्थी, शासकीय सेवा, निवडणूक तसेच कागदपत्रांमधील विविध त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची तातडीने पूर्तता करण्यासाठी हे शिबीर अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या अर्जदारांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्यांना यापूर्वीच ईमेल, एसएमएस आणि पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी 'विशेष खिडकी'चे नियोजन

सामाईक प्रवेश परीक्षांच्यानंतर (CET/NEET इ.) उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी 'जात वैधता प्रमाणपत्र' असणे बंधनकारक असते. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेमधून जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे नवे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी कार्यालयात 'विशेष खिडकी' सुरू करण्यात आली आहे, असेही आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे कळविण्यात आले आहे.

 

00000

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन