सामाजिक न्याय विभागाकडून आवाहन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘महाडीबीटी २.०’ वर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू

 सामाजिक न्याय विभागाकडून आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘महाडीबीटी २.०’ वर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू

अकोला, दि. ०७ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 'महाडीबीटी २.०' (MahaDBT 2.0) या नवीन पोर्टलवर अधिकृतपणे सुरू झाली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने सर्व विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्थांनी अर्जात अचूक माहिती भरावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अर्ज https://mahadbt2.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे समाजकल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :
सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन 'महाआयडी' तयार करणे बंधनकारक आहे. मागील वर्षाचे आयडी व पासवर्ड आता चालणार नाहीत. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाचा वापर करून नोंदणी करावी. आधार पोर्टलवर आपली वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि बँक खाते अद्ययावत ठेवावे. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र (Domicile) आणि शैक्षणिक गुणपत्रके स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत. नवीन आणि नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नवीन महाआयडी बनवावा लागेल. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगीननंतर 'माझा अर्ज नूतनीकरण करा' ही टॅब निवडावी. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्राचा हिस्सा खात्यावर जमा होताच विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाची शैक्षणिक फी अदा करावी.

महाविद्यालये व शिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना
शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया ही प्रवेश प्रक्रियेचाच अनिवार्य भाग म्हणून प्राधान्याने पूर्ण करून घ्यावी. मागील वर्षाच्या नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्याने भरून घेण्याची जबाबदारी संस्थांची राहील. महाडीबीटी २.० वर लिपीक (Clerk) लॉगीन बंद करण्यात आले असून, आता केवळ प्राचार्यांचे एकच मुख्य लॉगीन उपलब्ध असेल. प्रवेशाच्या वेळी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शिक्षण किंवा परीक्षा शुल्क आकारू नये. महाविद्यालयांनी आपली प्रोफाईल व शुल्क रचना तात्काळ अपडेट करावी. विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित न ठेवता विहीत मुदतीत मंजूर करून पुढे पाठवावेत.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन