ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
अकोला, दि. ०८ : उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अभिजित काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
१२ वी नंतर व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. संकेतस्थळावरील तांत्रिक समस्या आणि ओटीपी पडताळणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण व्हावेत, यासाठी महाआयटीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी केलेल्या विनंतीनुसार प्रशासनाने हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंतर्गत ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र राहणार. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ अंतिम तारीख असून शासकीय वसतीगृह प्रवेश योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतीम मुदतीचा (१५ सप्टेंबर) लाभ घेत लवकर आपले ऑनलाईन अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा