आधार नोंदणीच्या माध्यमातून हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश



 

 

 

आधार नोंदणीच्या माध्यमातून हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

 

अकोला, दि. १७  : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका हरविलेल्या बालकाचा शोध घेऊन त्याच्या कुटुंबाचा शोध लावण्यात यश आले.

दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी रेल्वेमध्ये पालकांविना प्रवास करणाऱ्या बालकांच्या शोधासाठी क्षेत्रीय कार्य करत असताना एक १६ वर्षीय बालक आढळून आला. बाल कल्याण समिती, अकोला यांच्या आदेशानुसार सदर बालकास शासकीय बालगृह, अकोला येथे दाखल करण्यात आले.

 

सदर बालक स्वतःबाबत विविध राज्यांतील पत्ते सांगत होता. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता अहमदाबाद येथील एका रुग्णालयाची वैद्यकीय फाईल आढळून आली. मात्र, या फाईलवर बालकाचा कोणताही पत्ता नमूद नव्हता. तसेच त्याच्याकडे रणीवाडा ते अहमदाबाद असे रेल्वेचे तिकीट आढळून आले. रणीवाडा हे राजस्थान राज्यात असून रुग्णालय गुजरात राज्यातील अहमदाबादेतील होते. बालक स्वतः बिहार तसेच दिल्ली येथील असल्याचे सांगत होता.

 

या पार्श्वभूमीवर रणीवाडा, अहमदाबाद तसेच बिहार राज्यातील औरंगाबाद येथील संबंधित पोलीस यंत्रणांशी संपर्क साधून बालकाचे छायाचित्र पाठविण्यात आले. तसेच कुटुंबाचा शोध घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, सुरुवातीला बालकाच्या कुटुंबाचा ठोस पत्ता मिळू शकला नाही.

 

त्यामुळे बालकाची आधार नोंदणीची प्रक्रिया करून व त्याचा पाठपुरावा करून सुमारे ८ दिवसांनी जुना आधार नोंदणी क्रमांक प्राप्त झाला. दि. १५ सप्टेंबरला   बालकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून जुना नोंदणी क्रमांक वापरून आधार कार्ड शोधण्यात आले व डाउनलोड करण्यात आले. त्यामध्ये बालकाचा पत्ता जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा राज्य असा असल्याचे निष्पन्न झाले.

 

आधार नोंदणीमध्ये नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या पालकांशी संपर्क घडवून आणण्यात आला. सुमारे दोन वर्षांनंतर एकमेकांना पाहून बालक व त्याची आई भावूक झाले.

 

त्यानंतर बालकाच्या कुटुंबीयांशी आवश्यक समन्वय साधून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी बालकाचे वडील अकोला येथे आले. बाल कल्याण समिती, अकोला यांच्या आदेशानुसार सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते बालकास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. लक्ष्मण हगवणे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य श्रीमती प्रांजली जैस्वाल, श्री. राजेश देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, सुनील लाडूलकर, शासकीय बालगृहाचे शिक्षक संजय मोते, सूर्योदय बालगृहाचे अधीक्षक शिवराज पाटील तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सचिन घाटे, आशिष तऱ्हाळे व श्री. महेंद्र गनोदे उपस्थित होते.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन