जिल्ह्यात अद्यापपर्यंत एक लाख ३२ हजार कुणबी नोंदी आढळल्या

 विविध कार्यालयांत अभिलेख तपासणीला वेग

जिल्ह्यात अद्यापपर्यंत एक लाख ३२ हजार कुणबी नोंदी आढळल्या

अकोला, दि. १७ : मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत असून, अद्यापपर्यंत  १ लाख ३२ हजार १६६ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

 

मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीची कार्यवाही सुरू आहे.

तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंद पत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर होत आहे. सातही तालुक्यांमध्ये सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण संख्या ५ लाख ३९ हजार ७०३ अभिलेख नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ७३ हजार ७७९ नोंदी आढळल्या. त्याचप्रमाणे, सन १९४८ पूर्वीच्या ४ लाख ४२ हजार ६४७ नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ५८ हजार ३८७ नोंदी आढळून आल्या.

 जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग, पोलीस विभाग, कारागृह विभाग, जिल्हा उपनिबंधक व इतर सर्व संबंधित यंत्रणांनी अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. 

या कार्याला गती मिळण्यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापण्यात आला असून, महसूली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागाकडील अभिलेख वगळता कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी जातीचे अभिलेख किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ