एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन

एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन

 

अकोला, दि. १७ : आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी, तसेच सातवी ते नववी या वर्गांतील अनुशेष भरून काढण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्यासाठी इयत्ता पाचवी, तसेच सहावी ते आठवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी  दि. १ फेब्रुवारी २०२४ पूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती क्षेत्रांतर्गत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी येथे, तसेच नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड येथे आणि यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी येथे एकलव्य निवासी शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावीत प्रवेश घेऊ इच्छिणा-या, तसेच इयत्ता सातवी ते नववी या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी स्पर्धा परीक्षा होणार आहे.

सर्व शासकीय, अनुदानित शाळा, आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रवेशपरीक्षेचा अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेऊन अकोला येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावा. अर्जाचा विहित नमुना आश्रमशाळा, तसेच प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.

आवेदनपत्रासह सक्षम प्राधिका-यांचा उत्पन्नाचा दाखला, तसेच पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला जोडावा. परीक्षा दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता सहावीसाठी सकाळी ११ ते १ या वेळेत, तर वर्ग सातवी ते नववीसाठी ११ ते २ या वेळेत होईल. परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी येथील शासकीय आश्रमशाळा, तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील शासकीय आश्रमशाळा ही दोन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम