अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना आदेश


अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा

जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना आदेश

अकोला, दि. 2 : जिल्ह्यात रसायन निर्मिती कारखान्यांतून अंमली पदार्थाचे उत्पादन होऊ नये यासाठी दरमहा तपासणी करून त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस, वन, वस्तू व सेवा कर, आरोग्य, उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन, पोलीस, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अधिका-यांचे पथक निर्माण करून औद्योगिक वसाहतीतील चालू, तसेच बंद पडलेल्या केमिकल कारखान्यांची दरमहा तपासणी करावी. कंपनीत कोणत्या पदार्थाचे उत्पादन होते व त्यात काही इतर रसायने मिसळून अंमली पदार्थ तयार होतात का, याची खातरजमा करावी. तसा अहवाल प्रशासनाला सादर करावा.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कुठेही गांजा, अफूची झाडे आदी लागवड होणार नाही, याची उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. औषधांच्या दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा लावणे अनिवार्य असून याबाबत अन्न व औषधे प्रशासनाने कार्यवाही करावी, तसेच अनधिकृत औषधांची विक्री होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात,

शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळा- महाविद्यालयांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागृतीपर कार्यक्रम घ्यावेत व प्रसिद्धी करावी. जिल्हा शल्यचिकित्सकांनी व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घ्यावा. वाहतूक पोलीसांना अंमली पदार्थांची वाहतूक होऊ नये म्हणून आवश्यक तपासण्या कराव्यात. डाक अधिक्षकांनी संशयास्पद पार्सल आढळल्यास तपासून तत्काळ पोलीसांना माहिती द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

०००  


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ