जिल्ह्यात यंदा पाच हजार एकर रेशीमशेतीचे उद्दिष्ट

 

रेशीम शेती वाढीसाठी महारेशीम अभियान

जिल्ह्यात यंदा पाच हजार एकर रेशीमशेतीचे उद्दिष्ट

 अकोला, दि. २० :  रेशीम शेती व उद्योग वाढीसाठी जिल्ह्यात महारेशीम नोंदणी अभियानाची सुरूवात आजपासून झाली असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा रेशीम शेती पाच हजार एकरापर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

 

रेशीम शेती पारंपरिक शेतीला चांगला पर्याय ठरत आहे. राज्यात दरवर्षी तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना राबविण्यासाठी नोंदणी करण्यात येते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तुती लागवड जोपासना व कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मजुरी व साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते. रोहयोअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत सहभाग वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार रेशीम शेती करणा-या शेतक-यांसाठी नोंदणी अभियान दि. २० डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

या योजनेतून ३ वर्षासाठी ३ लक्ष ९७ हजार ३३५ रू. मजुरी व साहित्यासाठी दिले जातात. अल्पभूधारक नसलेल्या मात्र रेशीम विकास योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या  शेतकरी बांधवांना सिल्क समग्र-२ या योजनेत सहभागी होता येईल. या योजनेतून तुती लागवड एक एकरासाठी ४५ हजार रू., ठिबक सिंचनासाठी ४५ हजार रू. प्रतिएकर, संगोपन गृहासाठी (६० बाय २५ फूट) २ लक्ष ४३ हजार, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रू., निर्जंतुकीकरण साहित्यासाठी ३ हजार ७५० रू. दिले जातात. सिल्क समग्र-२ या केंद्र पुरस्कृत योजनेतून सहभाग घेण्यासाठी रेशीम विभागाकडे नोंदणी करावी लागते.

 

नोंदणीसाठी निकष

अल्पभूधारक शेतकरी असावा. जॉबकार्डधारक, तसेच सिंचनाची सोय असावी. एका गावात पाच लाभार्थी मिळावेत. ग्रामपंचायत ठराव, कृती आराखड्यात समावेश असणे आवश्यक आहे. सातबारा, आठ अ, चतु:सीमा नकाशा, आधारकार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे आदी कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, एमआयडीसी फेज क्र. १, प्लॉट क्र. ८,९,१०, शिवर, अकोला येथे संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ