सोयाबीन नुकसान; पीक विमा नुकसानभरपाई वितरणास सुरुवात दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई अदा करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

अकोला, दि. ६  :  प्रधानमंत्री पीक विमा खरीप योजनेत शासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एचडीएफसी ऍग्रो पीक विमा कंपनीला दिले आहेत.  कंपनीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत सर्व ५२ महसूल मंडळातील २ लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांना २ लक्ष १६ हजार २३२ हेक्टर  क्षेत्रासाठी अंदाजे १२२ कोटी रू. नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा कंपनीकडून जमा होणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी अकोला दौऱ्यात रविवारी शासकीय विश्रामगृह  येथे विविध विषयांचा आढावा घेतला. आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते. 

अकोला जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये  पावसाचा खंड व सरासरीच्या कमी पाऊस झाला असल्याने तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये घट दिसून आली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकुल (mid season Adversity) 25 टक्के विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत अधिसूचना 6 सप्टेंबर 2023 रोजी लागू केली. 

एचडीएफसी ऍग्रो या पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते.  त्या आक्षेपाची पुर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच पूर्तता करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सर्व सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीने कळवले आहे.

ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

जिल्ह्यातील २ लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांनी २ लक्ष १६ हजार २३२ हे. क्षेत्रावर पीक विमा काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ