शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी अजित कुंभार






 शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 7 : विषमुक्त सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देतानाच, रासायनिक खते आदी निविष्ठांवरील खर्च करणे व शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. 

 

‘आत्मा’ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय नैसर्गिक व सेंद्रिय शेती कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे,  मिशनचे सहसंचालक डॉ. संतोष आळसे, मिशनचे अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे आदी उपस्थित होते.

शेतीमध्ये रसायनांचा वापर कमी करून खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, एकच पीक न घेता बहुविध पीकपद्धती रूजविणे व पीक प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन, विपणन यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यशाळेत विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. आळसे यांनी मिशनची संकल्पना समजावून सांगितली. श्री. शाह यांनी सेंद्रिय शेती योजनेची माहिती दिली. मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल हुशंगाबादे यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाबाबत माहिती दिली. जय किसान शेतकरी गटाचे संशोधन संचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळा या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे, कृषी तज्ज्ञ डॉ. आदिनाथ पसलावार यांनीही मार्गदर्शन केले.

 

तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल गोरे यांनी आभार मानले. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तंत्र व्यवस्थापक आदी उपस्थित होते.  

०००

 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम