मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रांवर शिबिरे;अल्प प्रगतीमुळे ३६ ‘बीएलओं’ना नोटीसा

 

 

 



मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रांवर शिबिरे;अल्प प्रगतीमुळे ३६ ‘बीएलओं’ना नोटीसा

एकही पात्र व्यक्ती मतदार नोंदणीविना राहू नये

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 10 : जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी झाल्याशिवाय राहू नये. नियोजित शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. मतदार नोंदणीच्या कामाची प्रगती अल्प असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ३०७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व २८ पर्यवेक्षक यांची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव व इतर अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात मतदार नोंदणीबरोबरच दि. २७ ऑक्टोबर ते दि. २९ डिसेंबर या कालावधीत नागरिकांकडून दुरुस्ती, वगळणी याबाबत दावे व हरकती मागविण्यात येत आहेत.  

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी दि. ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिबिरे घेण्यात आली. आता दि. २५ नोव्हेंबर व व दि. २६ नोव्हेंबर या तारखांना मतदान केंद्रांवर शिबिर होणार आहे. त्याचप्रमाणे, दि. १८ नोव्हेंबर व १९ नोव्हेंबर रोजी मतदार संघातील विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती, तसेच दि. २ व ३ डिसेंबर रोजी सेक्स वर्कर, तृतीय पंथी व भटक्या, विमुक्त जमातीतील व्यक्तींसाठी शिबिर होणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी दिले.

 

मतदार नोंदणीचे उत्कृष्ट काम असलेल्या ‘बीएलओं’चे अभिनंदन जिल्हाधिका-यांनी केले. तथापि, नोंदणीत अल्प प्रगती असलेल्या ३६ ‘बीएलओं’ना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. सर्व ‘बीएलओं’नी  आपल्या यादी भागातील दिव्यांगांची माहिती त्यांना चिन्हांकित करावे जेणेकरून त्यांना निवडणूकीच्या वेळेस सुविधा पुरविणे सोयीचे होईल, असेही निर्देश त्यांनी दिले.

   

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ