‘सखी’चा संकटग्रस्त महिलांना आधार आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत



 

‘सखी’चा संकटग्रस्त महिलांना आधार

आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत

 

अकोला, दि. २८ : येथील सखी वन स्टॉप सेंटरकडून आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत पुरविण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील महिलांचा समावेश आहे. महिलाभगिनींनी अन्याय  सहन न करता त्याविरोधात खंबीरपणे उभे राहावे. कुठल्याही संकटात न घाबरता निर्भिडपणे तक्रार मांडावी, असे आवाहन केंद्राच्या प्रशासक अॅड. मनिषा भोरे यांनी केले आहे.  

 

                  समाजात आढळून येणाऱ्या संकटग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी महिला व बाल विकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर चालवले जाते. त्याद्वारे कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ला, बाल अत्याचार, बालविवाह,अनैतिक वाहतूक, अपहरण, सायबर गुन्हा  व इतर कोणत्याही प्रकारे अत्याचारग्रस्त महिलांना मदत दिली जाते. त्यात केंद्राद्वारे समुपदेशन, कायदेविषयक मार्गदर्शन, पोलीस मदत, वैद्यकीय मदत व पाच दिवसीय तात्पुरता निवारा देण्यात येतो. जिल्हा स्त्री रुग्णालयात वॉर्ड क्र. ७ मध्ये सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित आहे.

   

    केंद्राद्वारे आजपर्यंत अनेक कुटुंबांना समुपदेशनाद्वारे वेगळे होण्यापासून वाचविण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचारांतर्गत प्रत्येक महिलेला विश्वासाचा आधार देत तिला संरक्षण देऊन तिला हक्काने तिच्याच कुटुंबासोबत राहण्याची व्यवस्था केंद्राद्वारे केली जाते. एक जवळची मैत्रीण म्हणून सखी केंद्र त्या प्रत्येक महिलेच्या जीवनाचा हिस्सा बनते. केंद्राकडून संकटग्रस्त महिलेशी सातत्याने संपर्क राखला जातो. वेळ प्रसंगी केंद्राचे कर्मचारी महिलांच्या घरी जाऊन सुद्धा मदतीचा हात पुरवितात.

        

महिला व बाल विकास विभागाकडून अकोला जिल्ह्यात महिलांचे हित व संरक्षणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सखी केंद्राची मदत मिळविण्यासाठी १८१ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित आहे. संकटग्रस्त भगिनींनी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले.

  ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ