मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक - महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर

 

मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक

-         महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर

 

अकोला, दि. 17 : मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया निश्चित केली असून, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असते, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी येथे दिली.

 

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून जिल्ह्यात १४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान दत्तकविधान आठवडा राबविला जात आहे. त्यानिमित्त बोलताना श्री. पुसदकर म्हणाले की, मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील संस्था किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाची निवड करावी लागते. त्यानंतर नोंदणी केलेल्या जोडप्याची गृहभेट घेऊन ते मुलाचा सांभाळ करण्यास सक्षम आहेत किंवा कसे, हे जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून तपासले जाते. त्यानंतर कक्षाच्या वतीने पोर्टलवर अहवाल पाठविला जातो. तो अहवाल पाठविल्यानंतर दत्तकविधानाच्या प्रक्रियेला सुरूवात होते.

या प्रक्रियेत पालकांची प्रतीक्षा यादी तयार होऊन साधारणत: दोन ते अडीच वर्षांचा काळ जातो. त्यानंतर इच्छूक दांपत्याला मूल दत्तक दिले जाते.

 

ऑनलाईन नोंदणी कुठे करावी?

 मूल दत्तक घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर जाऊन पालक ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरताना ज्या जिल्ह्यातून अर्ज केला जात आहे, तेथील संस्था किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाची निवड करणे बंधनकारक आहे. निवड केल्यानंतर अर्जदाराची गृहभेट घेऊन सविस्तर अहवाल पोर्टलवर अपलोड केला जातो.

 

आवश्यक कागदपत्रे

दत्तकइच्छूक पालक यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, बँक पासबुक, एचआयव्ही तपासणीसंदर्भात प्रमाणपत्र, आरोग्य प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

 

शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया होते. यात कुणाचाही हस्तक्षेप चालत नाही. जिल्ह्यात मूल दत्तक घेऊ इच्छिणा-या पालकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ