विशेष लेख: पशुपालन;पशुकल्याण आणि भूतदया

 






                    दिनांक ते २८ जानेवारी हा पंधरवडा 'पशुकल्याण पंधरवडा ' म्हणून साजरा करण्यात येत आहे. पशुधनासंबंधी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  तेव्हा आपल्याला पशुकल्याण ' म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडू शकतो.'पशुकल्याण 'म्हणजे पशुधनाला होणाऱ्या त्रास आणि वेदना कमी कमी करणे किंवा त्यासंबंधी विविध उपाय योजना आखणे. पशुंचे या पृथ्वीवरचे अस्तित्व मान्य करुन त्यांचे अधिकार मान्य करणे हीच खरी भूतदया होय. पशुकल्याण या संकल्पनेखाली अनेक विषय चर्चिले जातात. याविषयी सविस्तर चर्चा करणारा हा विशेष लेख.

 

            डेविड फ्रेसर या शास्त्रज्ञाने १९९९ मध्ये पशुकल्याण संकल्पना वैज्ञानिक धर्तीवर विस्ताराने प्रथमतः मांडली असली तरी जगाच्या पाठीवर अनेक धर्माच्या पंथाच्या चालीरितींमध्ये पशुकल्याण रुजलेले आढळते. पशुंच्या सहचर्यातून मानवी जीवन बहरत असताना मानवी भावभावनांचे पडसाद परस्परसंबंधात उमटणे स्वाभाविक होते. मानवाने पशुंच्या मूलभूत गरजा लक्षात घेत पाच स्वातंत्र्यमूल्यांचा पुरस्कार केला. ज्यात प्रामुख्याने पोषण स्वातंत्र्य (तहान, भूक, कुपोषण), तणाव स्वातंत्र्य (भौतिक व वातावरणीय बदल), आरोग्य स्वातंत्र्य (दुःख, वेदना, आजार), वर्तन स्वातंत्र्य (नैसर्गिक भावनांचे प्रकटीकरण) आणि भय स्वातंत्र्य (भीती) अशा स्वातंत्र्यघटकांचा समावेश होतो. पशूपालनात जागरूक पशूपालकाने सुद्धा पशूकल्याण ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. विविध पातळीवर पशूधनाच्या कल्याणकारी असणार्‍या प्रातींनिधिक उपायांचा ऊहापोह लेखात करण्यात आलेला आहे.

पशुकल्याण साधण्यासाठी केलेले उपायः-

·         भारतीय पशुकल्याण मंडळाची स्थापना (१९६२)

·         शासकीय पातळीवर विविध पशूकल्याण विषयक कायद्याची निर्मिती व सुधारणा

·         पशूंच्या मानवतावादी वागणुकीबद्दल नियमावली सुचवणे

·         कष्टाळू काम करणाऱ्या /भारवाहू कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांना त्रास कमी व्हावा या हेतूने वाहतूक साधनात सुधारणा

·         पशूंना उत्तम निवारा ,पाणी तसेच पशुवेद्यकीय सेवा पुरवणे

·         पशूकत्तखान्यात सुधारणा करणे

·         जखमी, आजारी किंवा संसर्गजन्य रोगाने बाधा झालेल्या प्राण्यांना उपचार सुश्रुषा करणे

·         नैसर्गिक आपत्ती मध्ये पशुधनाचे रक्षण, बचावकार्य -अनाथ पशूंना आश्रय देणे

·         पशूंच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांना /व्यक्तींना मदत करणे

·         पशूंना आरोग्यसेवा पुरवणे

·         पशुकल्याणाबाबत जनजागृती करणे

शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रात प्रयोगशालेय प्राण्यांवर करण्यात येणारे कल्याणकारी उपाय

            शासनाने पाळीव पशुंच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्यात उपयोग करण्याबद्दलच्या काही कायदे आणि नियमावली बनवली आहे. १९८२ च्या प्राण्यांच्या प्रयोगादाखल वापर करण्यासंबंधी बनवलेल्या कायदा-२६ नुसार,कोणत्याही पाळीव अथवा वन्य प्राण्याची बेकायदेशीररीत्या पालन अथवा प्रयोग करता येत नाही. केंद्रशासनाच्या वतीने यासंबंधी CPCSEA नावाची स्वतंत्र यंत्रणा समिती गठीत केली आहे. विविध तज्ज्ञ या समितीत असून वैविध्य शैक्षणिक, आरोग्य व पशुवैद्यक संशोधन केंद्रात चालणाऱ्या प्राण्यांच्या उपयोगावर देखरेख ठेवण्याचे काम करतात.

शहरांमध्ये कुत्रांच्या वाढत्या संख्यावर कल्याणकारी उपाय

मोठमोठ्या शहरात कुत्रांची वाढती लोकसंख्या हि मोठी समस्या झाली आहे.पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावा  घेतल्याने नागरिक त्रस्त होत असतात. कुत्र्यांच्या विणीच्या हंगामात कुत्र्यांचे कळप शहरभर फिरताना दिसतात, यातून रस्ते अपघात होण्याचा संभव असतो. त्यातच कुत्र्यांमध्ये एकाचवेळी ४ ते ६ पिल्ले होतात. या सर्व प्रकारातून कुत्र्यांच्या संख्येला आळा घालणे महत्वाचे ठरते. पशुकल्याणद्वारे कुत्र्यांना जीवे न मारता रेबिज प्रसार न होण्यासाठी त्यांचे लसीकरण करणे, निर्जंतुकीकरण तसेच निर्बिजीकरण करणे असे काही उपाय करणे. अनेक शहरात महानगरपालिकेमार्फत  Animal Birth Control (ABC) हा उपक्रम राबवल्या जातो.

मनोरंजनासाठी प्राण्यांच्या वापर करणाऱ्यांवर कायदेशीर अंकूश

            पाळीव अथवा वन्य प्राण्यांचे लोकांच्या मनोरंजनासाठी खेळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. साप पाळणारे गारुडी, अस्वल ,माकड यांचे खेळ करणारे मदारी यांना प्राण्यांचे खेळ करण्यास बंदी आहे. पाळीव प्राण्यांच्यात सुद्धा बोकड,एडके,कोंबड्या यांच्या झुंजी लावतात. त्याला सुद्धा कायद्याने बंदी आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांच्या टक्करी करण्यास बंदी आहे,यातून प्राणी गंभीर जखमी होतात प्रसंगी मरतात सुद्धा. म्हणून कायदेशीर अंकुश ठेवून पशुकल्याण साधण्यात येते.

ओझे/भारवाहू प्राण्यांसाठी कायदेशीर संरक्षण

            Prevention of cruelty to draught and pack animals Rules या नावाचा कायदा शासनाने १९६५ साली अस्तित्वात आणला आहे. १९६० च्या Prevention of cruelty to Animals Act चेच हे सुधारित रूप आहे. प्रत्येक लहान-मोठ्या भारवाहू पाळीव प्राण्यांबाबत काही मार्गदर्शन तत्वे /नियमावली दिली आहे.

पशू

लोखंडी चाके

टायरयुक्त चाके

रबरी  चाकेलहान

बैल,म्हैसरेडा

१०००

७५०

५००

मध्यम                                      

१०००

१०५०

७००

मोठे                                          

१४००

१३४०

९००

घोडे/खेचर                                  

१८००

७५०

५००

उंट

--

--

१०००

(ओझे किलोग्राम मध्ये)

महत्वाची काळजी

·         दिवसभरात ९ तासांपेक्षा अधिक काळ भारवाहू प्राण्यांना वापरू सलग ५ तासापेक्षा जास्त काळ ओझे वाहू देऊ नये.

·         दुपारी १२ ते ३ दरम्यान ३७ से.पेक्षा अधिक तापमान असल्यास प्राण्यांचा भारवाहनासाठी वापर करू नये.

प्राण्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना घ्यावयाची काळजी

             १९७८ च्या प्राण्यांची वाहतूक नियमानुसार, पाळीव प्राण्यांना असे  कुत्रा मांजर यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असल्यास प्रवाशासोबत नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून संबंधीत प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे. ज्या प्राण्याला प्रवासात न्यायचे आहे तो निरोगी असावा, कुठल्याही संसर्गजन्य रोगाची त्याला बाधा नसावी, भुकेलेले किंवा तहानलेले प्राणी, गाभण प्राणी, माजावर असलेले प्राणी माद्या नरांसोबत नेण्यास बंदी आहे. ज्या पिंजऱ्यात किंवा कंटेनरने नेत आहात त्या पिंजऱ्यास पत्ता, नाव, संपर्क क्रमांक इ. माहितीचा कागद चिकटवलेला असावा.

साथीच्या रोगाबद्दल कायदेशीर तरतूद

 पाळीव प्राण्यांचे आरोग्य रक्षण आपले इतिकर्तव्य आहे. काही माणसांपासून प्राण्यांना तर प्राण्यांपासून मानवाला होण्याचा संभव असतो. भयंकर रोगाचा प्रादुर्भाव पाळीव प्राण्यात दिसल्यास त्याचा प्रसार मानवात हेतू शकतो म्हणून यासंबंधी काही कायदे ब्रिटीश काळापासून केलेले आहेत. त्याची प्रातिनिधीक यादी खालीलप्रमाणे आहे.

१ग्लेंडर फार्सी कादा (अश्ववर्गातील प्राणी)-१८९९

२.डाऊरीन कायदा (अश्ववर्गातील प्राणी) -१९१०  

३.पशुधन कायदा-१९९८

४.विषबाधा कायदा-१९१९ (हेतुपुरस्सर विष देवून प्राण्यांना मारणे)

५.डेंजरस ड्रग्स अॅक्ट, १९३० (गांजा लागवड)

६.कॉस्मेटिक्स अॅक्ट, १८४०

भारतीय दंड  संहिता

कलम

प्रावधान

४४

बेकायदेशीरपणे जनावरांना इजा पोहोचवणे

२७१

आजारी /जंतूसंसर्ग बाधित जनावरांना वेगळ्या गोठ्यात न ठेवणे

२७२

अन्न पाण्यात भेसळ करणे

३७७

पशुसोबत लैंगिक /पाशवी  संबंध ठेवणे

 

प्राण्यांच्या आयात निर्यातीतून संसर्गजन्य रोगांचा संभाव्य रोगप्रसार फैलावू न देण्यासाठी उपाय

बर्ड फ्ल्यू,स्वाईन फ्ल्यू रोगांची लागण झाल्याने पशुधन तसेच मानवाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. बाहेरच्या देशातून किंवा प्रदेशातून आपल्या भागात येणारे पशुधन निरोगीच असेल असे नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणाचाही पशुधनाच्या आरोग्यावर कायम परीणाम होत असतो. दुसऱ्या भागातून आलेल्या पशुधनाला कळपात ठेवताना काही दिवस विभक्त पद्धतीत ठेवले जाते. याला 'क्वारंटाईन पिरियड' म्हणतात.घोड्यांमध्ये आफ्रिकन हॉर्स सिकनेस, स्वाईन फिव्हर, कोंबड्यातील मरेक्स असे आजार बाहेरून आलेल्या जनावरांमुळे आपल्या देशात आढळून आले आहेत.

जलमार्ग, हवाईमार्गे आणि नियंत्रण रेषेवर आयात निर्यात होणाऱ्या पशुधनाची कसून तपासणी केली जाते. त्यांचे निरोगी असल्याचे प्रमाणपत्र पशुवैद्यकांकडून दिले गेले असल्यासच त्यांना प्रवेश मिळू शकतो. सुमारे ९० दिवस म्हणजे ३ महिने अशा जनावरांना क्वारंटाईन म्हणजेच विभक्त ठेवले जाते. या दरम्यान त्यांच्या आरोग्याची तपासणी करून योग्य ते औषधोपचार केले जातात. भारतात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोचिन आणि अत्तारी (पंजाब) इथे आयातनिर्यात करताना पशुधनाची तपासणी करणारी कार्यालये आहेत. संसर्गजन्य रोगांबाबत आंतरराष्ट्रीय संघटनेने काही विलगीकरणाबाबत सूचना केल्या आहेत.

पशू

रोग

विलगीकरण कालावधी

गाई                

बुळकांड्या (Rinderpest)

२१ दिवस

रक्तक्षय (T.B)

३ महिने

घटसर्प (H.S)

२८ दिवस

थायलेरिया                

२८ दिवस

घोडे                 

डायरिया,ग्लॅन्डर्स                 

२८ दिवस

शेळ्या,मेंढ्या     

ब्रुसेलला, देवी                          

३० व २१ दिवस 

कुत्रे,मांजर       

रेबीज  

४ महिने

कोंबड्या        

फाऊलकॉलरा,   टायफॉईड , I.B

१४ दिवस

         प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागल्यास पशुंचे कल्याण सहज साधता येईल. नुकताच साजरा होणारा  संक्रांती सण  साजरा करताना आपण पतंग उडवताना मांजाचा वापर टाळल्यास आकाशात मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्यांना विनाकारण इजा होणार नाही. दिवसभरात दुपारपेक्षा पहाटे आणि सायंकाळी पक्ष्यांची वर्दळ आकाशात अधिक प्रमाणात असते तेव्हा अशावेळी आपण पतंग उडविणे टाळावे. आपणास जखमी पक्षी आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अवश्य दाखवा अथवा पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. लक्षात घ्या, पृथ्विवर मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार मान्य करणे हीच खरी भूतदया होय.

 

----लेखन

डॉ. प्रवीण बनकर,

सहाय्यक प्राध्यापक - पशूआनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला, संपर्क : ९९६०९८६४२९

डॉ. स्नेहल पाटील

पशुधन विकास अधिकारी,

तालपसचि, बार्शीटाकळी, जिल्हा अकोला.

(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ