पदवीधर मतदारसंघ निवडणूक: निरीक्षकांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा










 अकोला,दि. 15 (जिमाका)- अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी रोजी होत आहे. याकरीता भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरिक्षक    श्री. पंकजकुमार आज दाखल झाले.  त्यांनी निवडणूक यंत्रणेची  बैठक  घेऊन  निवडणूक पुर्व तयारीचा आढावा घेतला.

         जिल्हाधिकारी यांच्या दालनात निवडणूक तयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्र.अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार शिल्पा बोबडे आदि उपस्थिती होते.

         निवडणूक निरीक्षक श्री. पंकजकुमार यांनी निर्देश दिले की,  प्रत्येक मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था असावी. दिव्यांग मतदारांसाठी रॅमची देखील व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांच्या व मतदारांच्या तक्रारी येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. उमेदवारांना निवडणूकविषयक ज्या परवानग्या द्यायच्या आहेत, त्या वेळेत देण्यात याव्या. निवडणूक काळात अवैध दारू विक्री व वाहतूक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी. वाहने निवडणूकीसाठी वापरण्यास योग्य आहेत यांची खात्री करावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण महत्त्वाचे असून प्रशिक्षणादरम्यान बारकाईने सर्व बाबींची माहिती द्यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शहरातील मतदान केंद्राला दिली भेट

            दरम्यान आढावा बैठकीपूर्वी शहरातील राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल महाविद्यालय, सिताबाई कला वाणिज्य महाविद्यालय, राधादेवी गोयंका पब्लीक स्कुल येथील मतदार केंद्र असलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार सुनिल पाटील उपस्थित होते.

61 मतदान केंद्रावर 50 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

              अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 50 हजार 606 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 31 हजार 769 पुरुष, 18 हजार 831 स्त्री आणि सहा इतर मतदार आहेत. मतदान केंद्रावर सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करण्यात येईल. जिल्ह्यात एकूण 61 मतदान केंद्र आहे. या निवडणुकीसाठी 319 मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये 14 झोनल ऑफिसर, 61 प्रीसायडिंग ऑफीसर, 183 पोलिंग ऑफिसर आणि 61 मायक्रो ऑब्झर्वरचा समावेश आहे. वैद्यकीय सेवेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या अकोला येथे आल्यानंतर मतमोजणीसाठी अमरावतीला पाठविण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ