जात पडताळणी समितीतर्फे आज विशेष शिबिर
जात पडताळणी समितीतर्फे आज विशेष शिबिर
अकोला, दि. १९ : जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात १०० दिवस कृती आराखड्यांतर्गत उद्या दि. २०
रोजी कार्यालयीन वेळेत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिबिराचा
लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान शाखेत शिकत
असलेल्या विद्याथ्यांची जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ
नये व पुढील शिक्षणापासून वंचित राहु नये. त्याचप्रमाणे, विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, शैक्षणिक
व सामाजिक मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या
वर्षात जेईई, नीट, सी.ई.टी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन
अर्ज भरले आहेत, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीकडे त्यांचे जातीदावा
प्रकरण दाखल केले आहे. परंतु जातीदावा प्रकरणातील कागदपत्रे पुराव्याअभावी त्रुटी आढळुन
आल्याने अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही. तशा सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मोहिम शिबीराच्या
दिवशी कार्यालयीन वेळेत समितीकडे दाखल केलेल्या जातीदावा प्रकरणांची पावती व त्रुटी
पुर्ततेच्या मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र सा. काकुस्ते, उपायुक्त तथा सदस्य अमोल मो. यावलीकर
व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय
परिसरातील प्रशासकीय इमारतीत दुसरा मजल्यावर आहे. शिबीराच्या दिवशी त्रुटीची पुर्तता
करण्याकरीता विद्यार्थ्यांनी न चुकता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा