रुग्णालयात उष्माघात कक्ष व सुविधा सुसज्ज ठेवाव्या - जि. प. मुख्य कार्य. अधिकारी बी. वैष्णवी

 

रुग्णालयात उष्माघात कक्ष व सुविधा सुसज्ज ठेवाव्या

-       जि. प. मुख्य कार्य. अधिकारी बी. वैष्णवी

अकोला, दि. ६ : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असून, रूग्णालयांनी सुसज्ज उष्माघात कक्ष, शीतगृह, मुबलक औषध साठा, रूग्णवाहिका आदी व्यवस्था सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी दिले.

वातावरणीय बदल व मानवी आरोग्य कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी श्रीमती वैष्णवी यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. आशिष गि-हे आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात १४२ पर्यंत गेला असून, ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यात प्रदूषण वाढल्याचे दिसते. अशा वातावरणात नागरिकांत श्वसनाचे आजार वाढतात. त्यामुळे त्यादृष्टीने उपाययोजना व्हावी. वाढता उन्हाळा लक्षात घेता रूग्णालये सुसज्ज ठेवावी व नागरिकांमध्ये उष्माघातापासून बचावासाठी जनजागृती व्हावी, असे निर्देश श्रीमती वैष्णवी यांनी दिले.

अशी घ्यावी काळजी

उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. तशी लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

उन्हात शारीरिक श्रमाची, मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम, जास्त तापमानाच्या खोलीत काम, घट्ट कपड्याचा वापर, अधिक उष्णतेशी संबंध टाळावा. पाच वर्षांखालील मुले, वृद्ध, गर्भवती माता, दुर्धर आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी.

उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रूग्णाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी जवळच्या रूग्णालयात उपचार घ्यावे. शरीराला घाम येणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही वाटणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेनी, अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था, वांती होणे अशी लक्षणे उष्माघाताची असू शकतात.  

हे करा

डोक्याला रूमाल, टोपी, छत्री वापरा.

सौम्य रंगाचे सुती कपडे वापरा.

दुपारी १२ ते ४ या वेळेत घरात राहावे.

उन्हातून आल्यावर चेह-यावर ओला कपडा ठेवा.

थेट सूर्यप्रकाश अंगावर घेऊ नका.

पुरेसे पाणी प्या. ताक, लिंबू, नारळपाणी असे द्रव्य पदार्थ प्यावेत.

हे करू नका

भरउन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळा.

उन्हात अनवाणी चालू नका.

लहान मुलांना, पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडी बंद करू नका.

मद्य, चहा, कॉफी, अतिसाखर असलेल्या कार्बोनेटड द्रव्याचे सेवन टाळा.

दुपारी २ ते ४ या वेळेत स्वयंपाक टाळा.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम