जनकल्याण यात्रेद्वारे विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर
जनकल्याण यात्रेद्वारे विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा
जागर
अकोला, दि. ७ : विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी
जनकल्याण यात्रेला जिल्ह्यात आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी
झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ केला.
विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजनांबाबत जनकल्याण यात्रा गावोगाव जागृती
करणार आहे. या राज्यव्यापी यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ
यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यात दिंडोरी येथे झाला. विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची
माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी
श्री. कुंभार यांनी यावेळी व्यक्त केला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी,
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, तहसीलदार गौरी धायगुडे यांच्यासह विशेष सहाय्य विभाग,
जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयांचे कर्मचारी
विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग
निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन
व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची
रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे
स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी
संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी
करण्यात आले.
पात्र व्यक्तींनी लाभ घेण्याचे विशेष सहाय्य मंत्र्यांचे
आवाहन
दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केलेल्या माहितीपट यात्रेद्वारे
प्रदर्शित केला जात आहे. विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना कार्यालयात येरझारा
कराव्या लागू नये म्हणून रक्कम थेट डीबीटी पोर्टलद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येते.
गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. योजनेचा
प्रसार राज्यभर करण्यात येत आहे तरी सर्व पात्र व्यक्तींनी योजनांचा लाभ घ्यावा, असे
आवाहन मंत्री श्री. झिरवाळ यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा