उत्तमोत्तम उत्पादनांची ५० दालने;खाद्यपदार्थांची रेलचेल ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचा शुक्रवारी शुभारंभ
उत्तमोत्तम उत्पादनांची ५० दालने;खाद्यपदार्थांची
रेलचेल
‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचा शुक्रवारी शुभारंभ
अकोला, दि. २० : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त महिला व बाल विकास विभागाच्या
सहकार्याने ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शन उद्यापासून
(२१ मार्च) नव्या बसस्थानकासमोरील स्वराजभवन परिसरात सुरू होईल. ग्रामीण महिलाभगिनींनी
निर्माण केलेली अनेक उत्तमोत्तम उत्पादने या प्रदर्शनाद्वारे अकोलेकरांना उपलब्ध
होणार आहेत.
जिल्ह्यातील
सुमारे १०० बचत गटांचा प्रदर्शनात सहभाग असून, एकूण ५० दालनांद्वारे रसायनविरहित,
भेसळविरहित खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त वस्तू अशा अनेक
बाबी उपलब्ध होणार आहेत. हे प्रदर्शन दि. २३ मार्चपर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री
10 वा. दरम्यान सर्वांसाठी खुले आहे. या तीन दिवसांत बचत गटांच्या उत्पादन विक्रीतून
१५ लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित आहे.
ग्राहकांना महिला बचत गटांनी तयार केलेली उत्कृष्ट
उत्पादने मिळतील. रासायनिक रंग विरहित, कुठल्याच प्रकारच भेसळ नसलेले, स्वादिष्ट आणि आकर्षक उत्पादने
ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या उत्पादनामध्ये मायक्रोमच्या
शोभिवंत वस्तु ,बांबूचे टोपले, वारली पेंटिंग, गोडंबी ,लोकरीच्या च्या शोभिवंत वस्तू, घरातील,
देव्हाऱ्यातील शोभिवंत
वस्तू, ज्वेलरी, मातीपासून बनविलेल्या वस्तू, झाडू, फडा, तसेच
खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, रेडीमेड ढोकळा पीठ, नाना प्रकारचे सुगंधी मसाले, सर्व प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे पापड व पापड मसाले, गोडंबी ,पॉपकॉर्न. केळीपासून बनविलेले चिप्स,
सर्व प्रकारचे तृणधान्य/कडधान्य,
सर्व प्रकारच्या डाळी आदी उपलब्ध राहील.
त्याचप्रमाणे, विशेष दालनांद्वारे जेवणाबरोबरच खीर,
मांडे, रोडगे, आवळा पुरणपोळी,
बिट्ट्या, झुणका भाकर अशा
मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल राहणार आहे.
महिलांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन व विपणनाचे ज्ञान मिळावे या हेतूने तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच खरेदीदार-
विक्रेता बैठकही यादरम्यान घेण्यात येणार आहे. सामाजिक जाणीव
जागृती होण्याच्या हेतूने प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम
होतील. नवतेजस्विनी विक्री प्रदर्शनाला
अवश्य भेट देऊन बचत गटाच्या स्टॉलधारक महिलांचा उत्साह द्विगुणित करावा,
असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा